T20 World Cup 2024 IND vs BAN: वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला; बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत विक्रम नोंदवला!
T20 World Cup 2024 IND vs BAN: सुपर-8 मधील फेरीत भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह भारताने एक विक्रम देखील नोंदवला आहे.
T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) स्पर्धेत काल भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 50 धावांनी विजय मिळला. सुपर-8 मधील फेरीत भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह भारताने एक विक्रम देखील नोंदवला आहे.
टी-20 विश्वचषकात बांगलादेशला सर्वाधिक वेळा पराभूत करणाऱ्याच्या यादीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग सर्वाधिक वेळा कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाने 6 वेळा बांगलादेशचा पराभव केला आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बांगलादेशचा सलग 6 वेळा पराभव केला आहे. या यादीत भारताचेही नाव सामील झाले आहे. टीम इंडियाने टी-20 विश्वचषकात बांगलादेशचा सलग 5 वेळा पराभव केला आहे.
भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित -
भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालेय. भारताच्या नावावर चार गुण आहेत, त्याशिवाय नेटरनरेटही जबरदस्त आहे. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरोधात अतिशय मोठ्या फराकाने विजय मिळवावा लागेल. तसेच ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव करावा लागेल, तेव्हाच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत जाऊ शकतं. सध्या तशी शक्यता दिसत नाही. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी सकाळी होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान खडतर होऊ शकतं.
विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मासह सर्वच फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एकीकडे विकेट्स जात होत्या. मात्र आक्रमक फलंदाजीचा पवित्रा भारतीय फलंदाजांनी सोडला नाही. सामना जिंकल्यानंतर यावर रोहित शर्माने भाष्य केलं. रोहित शर्मा म्हणाला की, माझ्या मते तरी टी-20 मध्ये अर्धशतके आणि शतके झळकावण्याची गरज नाही, तुम्ही गोलंदाजांवर किती दबाव टाकता हे महत्त्वाचे आहे. सर्व फलंदाज सुरुवातीपासून असेच खेळत आले आहेत आणि आम्हालाही असंच खेळत राहायचं आहे. संघात खूप अनुभवी खेळाडू आहेत आणि संघ त्यांना पाठिंबा देतो, असं रोहित म्हणाला. आम्ही परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. आम्ही खरोखरच चांगले खेळलो. इथे वाऱ्याचा प्रभाव आहे, मात्र आम्ही हुशारीने खेळत आहोत. आठही फलंदाजांना त्यांची भूमिका पार पाडायची आहे. एकूणच आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. हार्दिक हा हार्दिक आहे, आम्हाला माहित आहे की तो काय करण्यास सक्षम आहे. तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो अशीच कामगिरी करत राहिल आणि संघाला एका चांगली धावसंख्या गाठण्यात मदत करेल, असं म्हणत रोहित शर्माने हार्दिक पांड्याचं कौतुक केलं.