T20 World Cup 2024: 'गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये...'; माजी खेळाडूने दिला सल्ला
T20 World Cup 2024: गॅरी कर्स्टन यांचे पाकिस्तानच्या संघाबाबत विधान व्हायरल झाल्यानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्यांना एक सल्ला दिला आहे.
T20 World Cup 2024: पाकिस्तान क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी पाकिस्तानच्या संघात उभी फूट पडल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. अनेक संघ पाहिले आहेत, पण मी अशी परिस्थिती पाहिली नाही. एवढं क्रिकेट खेळूनही या खेळाडूंना कोणता फटका कसा मारायचा हेही माहित नाही, असं गॅरी कर्स्टन यांनी सांगितले.
गॅरी कर्स्टन यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी (ICC T20 World Cup 2024) सुपर-8 मध्येही पोहोचू शकला नाही, त्यामुळे संपूर्ण संघ आणि प्रशिक्षक सदस्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तान संघाबाबत अनेक विधान केले आहे. मी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यापासून मला पाकिस्तानच्या संघात एकता दिसली नाही, असंही गॅरी कर्स्टन म्हणाले. कर्स्टन यांच्या या विधानावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग याने प्रतिक्रिया दिली आहे.
गॅरी कर्स्टन यांचे पाकिस्तानच्या संघाबाबत विधान व्हायरल झाल्यानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंगने त्यांना एक सल्ला दिला आहे. हरभजन सिंग ट्विट करत म्हणाला की, गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये... गॅरी कर्स्टन एक हिरा आहे. 2011 च्या आपल्या संघातील ते एक सर्वोत्तम प्रशिक्षक, मार्गदर्शक, मित्र आहेत. आपला 2011चा वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक... खास व्यक्ती गॅरी..., असं हरभजन सिंग ट्विटमध्ये म्हणाला आहे.
Don’t waste ur time there Gary .. Come back to Coach Team INDIA .. Gary Kirsten One of the rare 💎.. A Great Coach ,Mentor, Honest nd very dear friend to all in the our 2011 Team .. our winning coach of 2011 worldcup . Special man Gary ❤️ @Gary_Kirsten https://t.co/q2vAZQbWC4
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 17, 2024
नेमकं प्रकरण काय?
टी-20 विश्वचषकातील पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंशी चर्चा केली. कर्स्टन संघात सामील झाल्यापासून त्यांना संघात एकता दिसली नाही. याबाबत कर्स्टन म्हणाले की, खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत. मी याआधी अनेक संघांसोबत काम केले आहे, परंतु याआधी खेळाडूंमध्ये एकीची कमतरता मला कधीच जाणवली नाही. कर्स्टन यांनी असे विधान केल्याचे दावे पाकिस्तानी मीडियाने केले आहेत. पाकिस्तान संघात एकता नाही, ते त्याला संघ म्हणतात, पण तो संघ नाही. ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत; सगळे वेगळे आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. अनेक संघ पाहिले आहेत, पण मी अशी परिस्थिती पाहिली नाही. एवढं क्रिकेट खेळूनही या खेळाडूंना कोणता फटका कसा मारायचा हेही माहित नसल्याचे कर्स्टन म्हणाले.
पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर
पाकिस्तानला टी 20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये तर भारताकडून 6 धावांनी पराभव स्वीकारला होता. यानंतरही पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा कायम होत्या. मात्र, आयरलँड विरुद्ध अमेरिका मॅच पावसानं रद्द झाली. त्यामुळं अमेरिकेला फायदा मिळाला आणि ते सुपर 8 मध्ये गेले. तर, कॅनडा आणि आयरलँडला पराभूत करुनही पाकिस्तान क्रिकेट संघाला घरचा रस्ता धरावा लागला.
संबंधित बातम्या:
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...