Sachin Tendulkar : न्यूझीलंडकडून भारताचा 3-0 ने व्हाईट वॉश, सचिन टीम इंडियावर संतापला
Sachin Tendulkar on IND vs NZ Test Series : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर सचिन तेंडुलकरचांगलाच संतापला आहे.
Sachin Tendulkar on IND vs NZ Test Series : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडने भारताला अक्षरश: व्हाइट वॉश दिला आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंडचा हा मालिका विजय ऐतिहासिक ठरला. कारण तब्बल 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाला क्लीन स्वीप मिळाला आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या या लाजीरवाण्या कामगिरीवर भारताचा माजी खेळाडू आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने प्रतिक्रिया दिली आहे.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी नव्हती
सचिनने टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियाच्या x प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिनने टीम इंडियाच्या चूकांचा पाढा वाचला आहे. मात्र सचिनने शुभमन गिल आणि ऋषभ पंतचेही कौतुक केले आहे. कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी नव्हती, असं मत सचिन तेंडूलकरने व्यक्त केलं आहे.
सचिनकडून शुभमन गिल अन् ऋषभ पंतचे कौतुक
सचिनने भारताच्या पराभवाबाबत X वर एक पोस्ट शेअर केली आहे. सचिन म्हणाला, 'घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या मालिकेत 0-3 ने झालेला पराभव पचवणे सोपे नाही. तयारीचा अभाव होता का? शॉट सिलेक्शन चुकीचे होते की सामन्याची तयारी अपूर्ण होती? असे सवाल सचिनने उपस्थित केले आहेत. सचिनने पुढे बोलताना म्हणाला की, शुभमन गिलने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली आणि ऋषभ पंत दोन्ही डावात उत्कृष्टपणे खेळला. आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण होती.
न्यूझीलंडच्या खेळाडूंचे सचिनकडून कौतुक
टीम इंडियावर मिळवलेल्या निर्विवाद विजयानंतर सचिनने न्यूझीलंडच्या खेळाडूंचेही कौतुक केले. भारताविरुद्धच्या 0-3 अशा विजयाचे श्रेय सचिनने न्यूझीलंडला दिले आहे. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारताचा 8 विकेटने पराभव केला होता. दुसऱ्या कसोटीत त्यांनी 113 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरी कसोटी 25 धावांनी जिंकली.
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋषभ पंत अव्वल स्थानावर आहे. पंतने 3 सामन्यात 261 धावा केल्या. त्याने 30 चौकार आणि 8 षटकार लगावले. या मालिकेत भारताकडून यशस्वी जैस्वालने 190 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे. यशस्वीने 24 चौकार आणि 3 षटकार मारले.
इतर महत्त्वाच्या बातम्या