Dinesh Lad : शिर्डीचा पाच वर्षाचा युग घडवणार क्रिकेटमध्ये 'नवयुग', रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड देणार क्रिकेटचे धडे
Shirdi News : ग्रामीण भागातील शाळेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या नितीन बारहाते यांचा मुलगा युग बारहाते याला दिनेश लाड यांनी दत्तक घेत त्याला क्रिकेटचे धडे देणार असल्याचं सांगितलं आहे.
Yug Barhate from shirdi : भारतीयांमध्ये क्रिकेटचं वेड किती आहे? हे सांगायची गरज नाही. भारतातील जवळपास प्रत्येकजण क्रिकेट खेळतोतरी किंवा पाहतो तरी... पण इतक्या कोट्यवधी जनतेतून मोजक्याच व्यक्तींना भारतीय संघात स्थान मिळते. बालपणीपासून सराव केला तरच हे शक्य आहे... पण सरावाला प्रशिक्षणाची जोडही गरजेची असून शिर्डीच्या अशाच एका 5 वर्षाच्या मुलाला आता रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी दत्तक घेत कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील शाळेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या नितीन बारहाते यांचा मुलगा वयाच्या पाचव्या वर्षीच उत्कृष्ट क्रिकेट खेळत असून त्याच्या खेळाची दखल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी घेतली आहे. इतरांच्या मुलांंना प्रशिक्षण देणाऱ्या नितीन बारहाते यांना स्वतःच्या मुलाची निवड दिनेश लाड यांनी केल्याचं समजताच त्यांना मोठा आणि सुखद धक्का बसला. शिर्डी जवळील सावळीविहिर या छोट्या गावातील युग बारहाते हा 5 वर्षीय मुलाला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. त्याचा आदर्शही सचिन तेंडुलकर हा असून हळूहळू वडिलांबरोबर क्रिकेटचे धडे घेणाऱ्या युगच्या गुणांची दखल अखेर रोहितचे प्रक्षिक्षक दिनेश लाड यांनी घेतलं आहे. युगच्या उपजत गुणांची दखल थेट रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी घेतली आणि त्यांनी थेट युगला दत्तक घेत क्रिकेटसह शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.
वडिलांचं स्वप्न युग पूर्ण करणार
क्रिकेट विश्वात नाव कमवण्याचं अधुर राहिलेलं स्वतःच स्वप्न मुलगा पूर्ण करील असा विश्वास युगचे वडिल नितीन यांना असल्याचं यावेळी त्यांच्या डोळ्यात दिसून आलं. परिस्थिती जेमतेम असल्याने क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या रूपाने बारहाते कुटुंबीयांना जणू काही देवच भेटल्याची भावना बारहाते कुटुंबियांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीत असे अनेक हिरे असून त्यांना योग्य प्रशिक्षणाची जोड मिळायला हवी हे खरं आहे.
करमाळाच्या वनराजलाही दिनेश लाड यांनी घेतलं दत्तक
मागील महिन्यांत करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण (Chikhalthan) येथील सात वर्षीय वनराज सुधीर पोळला देखील दिनेश लाड यांनी दत्तक घेतलं होतं. वनराज एक गरिब कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील वन विभागात वन रक्षक पदावर कार्यरत आहेत. वनराजला लहानपणापासून क्रिकेटचे अफाट वेड आहे. पण हा खर्चिक खेळाची हौस कशी पुरवायची? हा प्रश्न वनराजच्या कुटुंबासमोर होता . वनराजसाठी वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे क्रिकेटचे किट आणून दिल्यावर त्यानं घरासमोर वडिलांकडून नेट बांधून घेऊन रोज सराव करायला सुरुवात केली. कोणतंही प्रशिक्षण न घेता फक्त टीव्हीवरील खेळ पाहून वनराजनं आपल्या खेळात सुधारणा केल्या. ज्यानंतर वनराजची खेळाची आवड पाहून वडिलांनी त्याच्या खेळण्याच्या काही क्लिप दिनेश लाड अकादमीचे लाड यांच्या मोबाईलवर पाठवून दिल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिनेश लाड यांनी फोन करून वनराजसह मुंबईला येण्याचे निमंत्रण दिलं.
हे देखील वाचा-