(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karmala: करमाळा येथील सात वर्षाच्या चिमुकल्याला रोहित शर्माचे प्रशिक्षक देणार क्रिकेटचे धडे, त्याचा खर्चही उचलणार
Maharashtra: करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण (Chikhalthan) येथील सात वर्षीय मुलगा वनराज सुधीर पोळला रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी दत्तक घेतलंय.
Maharashtra: करमाळा (Karmala) तालुक्यातील चिखलठाण (Chikhalthan) येथील सात वर्षीय मुलगा वनराज सुधीर पोळला रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी दत्तक घेतलंय. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतल्याने आता हा चिमुरडा मुंबईला जायची तयारी करू लागला आहे. अंगावर क्रिकेटचे किट चढवून मैदानात उतरताच वनराजच्या अंगात सचिन आणि रोहित संचारतो. वनराज गरिब कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडील वन विभागात वन रक्षक पदावर कार्यरत आहेत.
वनराजला लहानपणापासून क्रिकेटचे अफाट वेड आहे. पण हा खर्चिक खेळाची हौस कशी पुरवायची? हा प्रश्न वनराजच्या कुटुंबासमोर होता . वनराजसाठी वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे क्रिकेटचे किट आणून दिल्यावर त्यानं घरासमोर वडिलांकडून नेट बांधून घेऊन रोज सराव करायला सुरुवात केली. कोणतंही प्रशिक्षण न घेता फक्त टीव्हीवरील खेळ पाहून वनराजनं आपल्या खेळात सुधारणा केल्या आहेत. त्याचा खेळ पाहून सर्वांना भुवया उंचावतात.
वनराजचे क्रिकेटमधील उल्लेखनीय कौशल्य पाहून लाड प्रभावित
वनराजची खेळाची आवड पाहून वडिलांनी त्याच्या खेळण्याच्या काही क्लिप दिनेश लाड अकादमीचे लाड यांच्या मोबाईलवर पाठवून दिल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिनेश लाड यांनी फोन करून वनराजसह मुंबईला येण्याचे निमंत्रण दिलं. दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर अशा अनेक नामवंत खेळाडूंना प्रशिक्षण दिलंय. वनराजचे क्रिकेटमधील उल्लेखनीय कौशल्य पाहून प्रशिक्षक दिनेश लाडदेखील प्रभावित झाले. इतक्या कमी वयात क्रिकेटमधील सहजता त्यांना आवडली आणि त्यांनी वनराजला दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला . यासाठी लाड यांनी वनराजचे नाव बोरिवली येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करणार असल्याचं वनराजच्या वडिलांना सांगितलं .
वनराजचा यापुढील सर्व खर्च लाड अकादमी उचलणार
गरीब परिस्थितीतील पोळ कुटुंबाला हे ऐकून खूप आनंद झाला. मात्र, यासाठीच्या खर्चाचा विचार येताच त्यांच्या पोटात गोळा आला . मात्र दिनेश लाड यांनी वनराजचा यापुढील सर्व खर्च त्यांची अकादमी उचलणार असल्याचं सांगत वनराजला क्रिकेटचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणार असल्याचं म्हटले . यामुळं सध्या पोळ कुटुंब आनंदात असून वनराजलाही आता मुंबईला जायचे वेध लागलंय.
देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं वनराजचं स्वप्न
वनराज सध्या चिखलठाण येथील आपल्या घरासमोर जोरदार सराव करीत असून रोज सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत जोरदार तयारी करीत आहे. आपल्याला लाड सरांकडून क्रिकेट शिकायचं असून सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा सारखं भारतासाठी क्रिकेट खेळायचं असल्याचं वनराज सांगतोय . महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खेळ , कला ठासून भरली असून येथील बालगोपाळांचा रक्तातच हे गुण असल्यानं दिनेश लाड यांच्या या प्रयत्नामुळं चिखलठाणसारख्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील वनराज उद्या भारतीय संघात चमकला तर यात वेगळे वाटायचं कारण नाही .
हे देखील वाचा-