Phaltan Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
Phaltan Doctor Death: आत्महत्या केलेल्या युवती डाॅक्टरच्या चुलत बहिणीने सांगितले की, तिच्यावर पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी सतत दबाव आणला जात होता.

Phaltan Doctor Death: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांचा उद्रेक झाला आहे. आत्महत्या केलेल्या युवती डाॅक्टरच्या चुलत बहिणीने सांगितले की, तिच्यावर पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी सतत दबाव आणला जात होता. “फिट” प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिल्याने तिच्यावर मानसिक त्रास वाढत गेला. तिने या संदर्भात अधिकाऱ्यांना पाच पानांचे पत्र आणि माहितीच्या अधिकाराखाली अर्जही दिला होता, परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी फक्त हातावरील नोटवर न जाता पत्राची दखल घ्यावी
चुलत बहिणीने सांगितले की, “दररोज 80 ते 90 पोस्टमार्टम करणारी आमची बहीण कमी ताकदवान नव्हती; ती आत्महत्या करू शकत नाही,” असे कुटुंबाने ठामपणे म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर न जाता, तिच्या दिलेल्या पत्राची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, ती घरातील कर्ती मुलगी होती; तिच्या शिक्षणाचे कर्जही अद्याप फिटले नव्हते. “आमची मुलगी परत येऊ शकत नाही, पण तिच्या आई-वडिलांना आधार देण्यासाठी तिच्या छोट्या भावाला नोकरी मिळावी,” अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
कारवाई झाली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित
दुसरीकडे, व्हायरल झालेल्या तीन अर्जांमध्ये संबंधित महिला डॉक्टरनं आपल्या जीवाचं बरं वाईट झाल्यास पोलीस जबाबदार असतील असेही म्हटलं असतानाही कारवाई करावी, असे ना संबंधित यंत्रणेला वाटले ना डीवायएसपींना. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून घडणाऱ्या घटनांनी व्यथित होऊन गेल्याचे दिसून येते. एका अर्जामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर धुमाळ यांचा सुद्धा उल्लेख आहे. त्यांच्याकडूनही कारवाई झाली नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे राजकारणी आणि पोलिसांच्या अभद्र युतीमध्ये एका महिला डॉक्टरचा बळी गेल्याने संतापाची लाट उसळली आहे.
सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या अर्जांमध्ये पहिला तक्रार अर्ज 19 जून 2025 रोजीचा आहे. या अर्जामध्ये संबंधित डॉक्टर युवतीकडून फलटणचे डीवायएसपींच्या नावाने अर्ज लिहिण्यात आला आहे आणि या संदर्भात त्यांनी आरोपी फिट नसताना देखील 'मॅडम फिट द्या' असा दबाव आणल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अर्जामध्ये उल्लेख आहे. यानंतर माहिती अधिकारातून कोणती कारवाई केली याची माहिती मागवली होती. यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयाला चौकशी अहवाल दिला होता. त्यामध्ये त्यांनी आपलं बरं वाईट झाल्यास पोलिस जबाबदार असतील, असं म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या


















