Rohit Sharma : श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली, रोहित शर्मा भाकरी फिरवण्याची शक्यता, वनडेमध्ये मुंबईकर खेळाडूला संधी मिळणार?
Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका गमावल्यानंतर रोहित शर्मा पुढील वनडे मालिकेसाठी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली :रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट(Tem India) संघानं टी 20 वर्ल्डकप विजय मिळवत इतिहास घडवला होता. यानंतर रोहितच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेत भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेट संघ आता पुढील एकदिवसीय मालिका फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) पूर्वी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यामुळं रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापुढं मोठं आव्हान असणार आहे. यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी रोहित शर्मा भारतीय संघात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा भाकरी फिरवणार
रोहित शर्मासोबत एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात सध्या शुभमन गिल करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिल सलामीवीर म्हणून अपयशी ठरला आहे. चॅम्पियन्स ट्राफीपूर्वी भारतीय संघ केवळ तीन सामने खेळणार आहे. यामुळं आगामी काळात सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वालला देखील संधी दिली जाऊ शकते. यशस्वी जयस्वाल 2024 मधील आक्रमक आणि यशस्वी क्रिकेटपटू आहे.
वॉशिंग्टन सुंदर आणि रियान परागला संधी मिळण्याची शक्यता
भारताच्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून आगामी काळात रोहित शर्मा वॉशिंग्टन सुंदर आणि रियान परागला अधिक संधी देऊ शकतो. हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा प्रश्न असल्यानं नुकतीच त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली होती. पुढील काळात भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि शिवम दुबे यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात येऊ शकतो. शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांना अधिक संधी दिली जाऊ शकते.
वेगवान गोलंदाजाचा शोध
भारत आणि श्रीलंका दौऱ्यात जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा सदस्य नव्हता. भारताच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजवर होती. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकले नाहीत. मोहम्मद सिराज तिसऱ्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्यामुळं इंग्लंड विरुद्धची मालिका असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी जसप्रीत बुमराह सोबत भारतीय संघात दमदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज देखील महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित शर्मा मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगवर विश्वास दाखवणार की नव्या खेळाडूला संधी देणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार न झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीनं खेळवली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :