World Cup : पुण्यात विराट कोहलीच किंग, तर गोलंदाजीत बुमराहचा जलवा, पाहा एमसीएच्या मैदानाची आकडेवारी
आता 19 ऑक्टोबर रोजी दुपारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पुण्याच्या एमसीए मैदानाबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात..
Records Maharashtra Cricket Association Stadium, Pune in ODI matches : पुण्यातील मैदानात गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताने सलग तीन विजयासह दमदार सुरुवात केली आहे. आता 19 ऑक्टोबर रोजी दुपारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पुण्याच्या एमसीए मैदानाबाबतची सर्व माहिती जाणून घेऊयात..
पुण्याची खेळपट्टी कशी आहे ?
पुण्यातील मैदानात धावांचा पाऊस पडतो. एमएसीच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. फलंदाजांसाठी हे मैदान स्वर्ग मानले जाते. सपाट खेळपट्टीवर विराट कोहली, रोहित शर्मा धावांचा पाऊस पाडू शकतात. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.
पुणे स्टेडिअमवर भारताचा रेकॉर्ड कसा ?
पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर आतापर्यंत सात एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये चार सामन्यात भारताचा विजय झाला आहे. 2013 मध्ये या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा 72 धावांनी पराभूत केले होते. पुण्याच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्यांदाच आमनासामना होत आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाने पुण्याच्या मैदानावर भारताचा पराभव केला आहे. पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाची सर्वोत्तम धावसंख्या सात बाद 356 इतकी आहे. तर न्यूझीलंडला 230 धावांत रोखले आहे.
सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ?
पुण्याच्या एमसीए मैदानावर विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने सात एकदिवसीय सामन्यात 64 च्या सरासरीने 448 धावा चोपल्या आहे. विराट कोहलीने पुण्याच्या मैदानावर दोन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. केएल राहुल याने या मैदानावर एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 185 धावा चोपल्या आहेत. हार्दिक पांड्याने 5 सामन्यात 170 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने येथे 147 धावा केल्या आहेत.
सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावर ?
पुण्याच्या एमसीए मैदानावर भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने सहा डावात 10 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. बुमराहने तीन डावात 8 विकेट घेतल्या आहेत. 35 धावांच्या मोबदल्यात चार विकेट, बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शार्दूल ठाकूरने तीन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
बांग्लादेश क्रिकेट संघ
लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तनजीम हसन, शाकिब, शाकब नसूम अहमद, महेदी हसन.
कुणाचं पारडं जड?
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 40 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत, तर 8 बांगलादेशने विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया विरोधातील आगामी सामना जिंकणं बांगलादेशसाठी सोपं नसेल. बांगलादेशला कडव्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार. भारत आणि बांगलादेश यांच्यात यावर्षी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला आहे. आशिया कप 2023 मध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना 265 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 259 धावांवर भारतीय संघाचा डाव आटोपला.