Quinton De Kock Retirement: क्विंटन डी कॉक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
Quinton de Kock Retirement From Test Cricket : दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Quinton de Kock Retirement From Test Cricket : दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी तात्काळ प्रभावाने निवृत्ती घेतल्याचं यावेळी क्विंटन डी कॉक याने सांगितलं. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. क्विंटन डी कॉकच्या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.
29 वर्षीय क्विंटन डी कॉक याने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. क्विंटन डी कॉकने आतापर्यंत 54 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने 38.82 च्या सरासरीने तीन हजार 300 धावा चोपल्या आहेत. 141 ही कसोटीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. क्विंटन डी कॉकने कसोटीत सहा शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. 54 कसोटीतील 91 डावांत फलंदाजी करताना डिकॉकने 411 चौकार आणि 33 षटकार लगावले आहेत. क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचे नेतृत्वही केलं आहे. यष्टीरक्षणादरम्यान क्विंटन डी कॉकने 232 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. यामध्ये 221 झेल आणि 11 स्टपिंगचा समावेश आहे.
BREAKING: #Proteas wicket-keeper batsman, Quinton de Kock has announced his retirement from Test cricket with immediate effect, citing his intentions to spend more time with his growing family.
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 30, 2021
Full statement: https://t.co/Tssys5FJMI pic.twitter.com/kVO8d1e0Ex
निवृत्तीवेळी काय म्हणाला क्विंटन डी कॉक?
माझ्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे नव्हते. मी बराच वेळ माझ्या भविष्यावर विचार केला. आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे, याबाबत विचार केला. लवकरच मी आणि साशा आमच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहोत. थोडक्यात आमचे कुटुंब वाढणार आहे. माझ्यासाठी माझे कुटुंबच सर्वस्व आहे आणि म्हणूनच मला त्यांना देण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे, त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.