(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Champions Trophy : तुम्ही आम्हाला लेखी द्या, बीसीसीआयकडे पीसीबीची अनोखी मागणी, वाचा काय घडलं?
Champions Trophy: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे अनोखी मागणी केली आहे. बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (ICC Champions Trophy) आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान (Pakistan) या स्पर्धेचं आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करणार आहे. ही स्पर्धा दोन गटात खेळवली जाणार असून भारत(Team India), पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश एकाच गटात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील मॅच 1 मार्च 2025 ला निश्चित करण्यात आली आहे. मात्र, बीसीसीआयनं (BCCI) भारत सरकारच्या निर्णयाचा दाखला देत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयनं आशिया कप प्रमाणं भारताच्या मॅचेस त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आता या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नवी भूमिका समोर आली आहे. पीसीबीनं बीसीसीआयकडे थेट लेखी देण्याची मगाणी केली आहे.
पीसीबीनं बीसीसीआयकडे काय लेखी मागितलं?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बाबत नवी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार पीसीबीनं भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडे अनोखी मागणी केली आहे. भारत सरकार पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास परवानगी देत नाही हे बीसीसीआयनं लेखी द्यावं, असं पीसीबीनं म्हटलं आहे.भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान खेळण्यास परवानगी दिली नसल्याचं बीसीसीआयनं लेखी देण्याची मागणी केल्याची पीसीबीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी येणार की नाही हे प्रकरण लवकर संपवावं असं वाटत आहे. आयसीसीची वार्षिक पत्रकार परिषद 19 जुलै रोजी कोलंबोत होणार आहे. त्यामध्ये हायब्रीड मॉडेलचा विषय अजेंड्यावर नाही.
रिपोर्टनुसार पीसीबीच्या सूत्रांनी म्हटलं की, भारत सरकार परवानगी देत नाही तर बीसीसीआयनं याबाबतचं पत्र आयसीसीला तातडीनं द्यावं. बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार की नाही हे किमान पाच ते सहा महिने आयसीसीला लेखी द्यावं, असं म्हटलं.
पाकिस्तानमध्ये क्रिकेट संदर्भात भारताच्या टीमबाबत केंद्र सराकर अंतिम निर्णय घेणार आहे. 2023 च्या आशिया कपचं आयोजन देखील पाकिस्ताननं केलं होतं. भारतानं त्यावेळी देखील पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते.बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील त्याच पद्धतीचा वापर करण्यात यावा असं म्हटलं आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचं नेतृत्व रोहित शर्मा करणार असल्याचं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :