David Warner : डेविड वॉर्नरला दणका, ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचं ठरलं, चॅम्पियन्स ट्रॉफीविषयी मोठी अपडेट
David Warner : ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीनं दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नरला दणका दिला आहे. डेविड वॉर्नरनं काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं.
मेलबर्न: ऑस्ट्रेलियानं (Australia) आगामी इंग्लंड आणि स्कॉटलँड दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीनं डेविड वॉर्नरसंदर्भात (David Warner) मोठा निर्णय घेतला आहे. वॉर्नरनं काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं. डेविड वॉर्नरनं यासाठी निवृत्ती देखील मागं घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी डेविड वॉर्नरला चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान दिलं जाणार नाही अशी शक्यता व्यक्त केली. डेविड वॉर्नरनं टी 20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाच्या खराब कागमिरीनंतर कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
डेविड वॉर्नरचा यूटर्न पण...
डेविड वॉर्नरनं कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली होती. डेविड वॉर्नरनं 8 जुलै रोजी टी 20 क्रिकेटमधून निवृ्त्ती जाहीर केली होती. त्यानंतर डेविड वॉर्नरनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं होतं. मात्र, निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी डेविड वॉर्नरनं पूर्णपणे सन्यास घेतल्याचं म्हटलं. कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी जे योगदान दिलं त्याचं कौतुक करण्याची गरज आहे, असं जॉर्ज बेली म्हणाले.
जॉर्ज बेली यांनी डेविड वॉर्नर याच्याबाबत म्हटलं की, तुम्ही काही सांगू शकत नाही की डेविड वॉर्नर कधी गंमत करत असेल किंवा नाही. मात्र, डेविड वॉर्नरनं संपूर्ण प्रक्रियेला धक्का दिला, असं म्हटलं. डेविड वॉर्नरची कारकीर्द शानदार होती. यापुढील काळात आम्ही ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी डेविड वॉर्नरच्या योगदानावर विचार केला जाईल, असं जॉर्ज बेली म्हणाले. आम्ही डेविड वॉर्नर सारख्या महान खेळाडूचा वारसा पुढं नेत राहू, असंही ते म्हणाले.
ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्ध 3 टी 20 सामने आणि 5 एकदिवसीय सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये डेविड वॉर्नरला स्थान देण्यात आलेलं नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानं आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या जॅक फ्रेजर मॅक्गर्कला संघात स्थान दिलं आहे. यापूर्वी मॅक्गर्कला टी 20 वर्ल्ड कपमध्ये राखीव खेळाडू म्हणून संधी दिली होती. आता त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :