(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL मध्ये दोन नव्या संघांसाठी जुलैमध्ये बोली लागणार; अवाक् करणारी असेल किंमत
IPL मध्ये दोन नव्या संघांचा समावेश करणार असल्याची घोषणा BCCI नं यापूर्वीच केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता या संघांसाठी जुलैमध्ये बोली लागू शकते.
IPL : इंडियन प्रीमियर लीग फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. जगभरातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगच्या यादीतही आयपीएलचा समावेश करण्यात येतो. बीसीसीआयनं पुन्हा एकदा आयपीएलचा विस्तार वाढवण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड पुढच्या महिन्यात दोन नव्या संघांसाठी लिलावाचं आयोजन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयनं यापूर्वीच आयपीएलमध्ये संघाची संध्या 8 वरुन 10 करणार असल्याची घोषणा केली आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय लवकरात लवकर आयपीएलमध्ये दोन नव्या संघाचा समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही नव्या संघांसाठी बोली लावण्यासाठी लिलावाचं आयोजन पुढील महिन्यात जुलैमध्ये केलं जाऊ शकतं. त्यासोबतच आयपीएलच्या नव्या संघांसाठी बोली लावण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कंपन्यांना बोलीच्या रकमेचा अंदाजही आला आहे.
रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आयपीएलच्या नव्या संघांसाठी बीसीसीआय 1800 कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवू शकते. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सची किंमत 1855 रुपये आहे, तर आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणजे, सीएसके. याची वॅल्यू 2300 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
मुंबई इंडियन्सची किंमत सर्वाधिक
आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या किमतींमध्ये जवळपास एक हजार कोटी रुपयांचं अंतर आहे. मुंबई इंडियन्सची किंमत 2800 कोटी रुपयांच्या आसपास आहे. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त सनराइजर्स हैदराबादची किंमत मुंबई इंडियन्स आणि सीएसकेच्या तुलनेत कमी आहे.
इतर संघांची किंमत पाहता बीसीसीआय नव्या संघासाठी 1800 कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवू शकते. नव्या संघांची किंमत 2500 कोटी रुपयांच्या जवळपास जाण्याचा बीसीसीआयचा अंदाज आहे. लिलाव जुलैमध्ये होऊ शकतो. तसेच या वर्षा अखेरिस बीसीसीआय आयपीएलशी निगडीत खेळाडूंसाठी मेगा बोलीचं आयोजन करणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमझ्ये सामन्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :