(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सौरभ गांगुलीची सुट्टी; दिल्ली कॅपिटल्सने खेळला मोठा डाव, BCCIने बॅन केलेल्या क्रिकेटपटूला बनवले कोच
Delhi Capitals new head Coach News : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान कोण सांभाळणार? हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात घोळत आहे.
Delhi Capitals new head Coach : आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान कोण सांभाळणार? हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात घोळत आहे. पुढच्या मोसमात दिल्लीचे कर्णधारपद ऋषभ पंतकडून काढून दुसऱ्या खेळाडूकडे सोपवले जाऊ शकते, असे वृत्त आहे. दरम्यान, आयपीएल मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने मोठी घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने भारताच्या माजी क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
सौरभ गांगुलीची सुट्टी
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. संघाच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले आहेत ज्यात JSW आणि GMR गट प्रत्येकी दोन वर्षांसाठी संघाचे व्यवस्थापन सांभाळतील. यासोबतच सौरव गांगुलीच्या भूमिकेवरही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली यापुढे दिल्ली कॅपिटल्स संघात थेट भूमिका घेणार नाही. तो व्यवस्थापनाचा भाग राहील, पण आयपीएलमधून बाहेर असेल.
सौरव गांगुली हे गेल्या दोन हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे संचालक आहेत आणि भविष्यातही तो या पदावर दिसणार आहे. मात्र, पुढील दोन वर्षांसाठी तो दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्स आणि महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्ससाठीच ही भूमिका बजावेल. तो आयपीएलचा भाग असणार नाही.
हेमांग बदानीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
दिल्लीने एका माजी क्रिकेटपटूची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे ज्याला फक्त 4 कसोटी आणि 40 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. हेमांग बदानी असे या माजी क्रिकेटपटूचे नाव आहे. 47 वर्षीय हेमांग 2001 ते 2004 या काळात भारतीय संघाचा भाग होता. या काळात त्याने केवळ 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. दिल्लीने हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे तर वेणुगोपाल राव यांची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली आहे.
BCCIने बॅन केलेल्या हेमांग बदानीला बनवले कोच
2003 च्या वर्ल्ड कप भारतीय संघाचा भाग असलेल्या तामिळनाडूच्या माजी अनुभवी फलंदाजावर बीसीसीआयने बंदी घातली होती. त्याचे कारण म्हणजे इंडियन क्रिकेट लीग (ICL) मध्ये सामील होणे. 2008 मध्ये आयपीएल सुरू होण्यापूर्वी झी नेटवर्कने आयसीएल सुरू केले होते, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील खेळाडूंनी भाग घेतला होता. बदानीही या लीगमध्ये चेन्नई सुपरस्टार्सचा भाग बनला. बीसीसीआयने आयसीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदी घातली होती. 2009 मध्ये बंदी उठवण्यात आली आणि त्याला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आणि त्यानंतर 2010 मध्ये बदानीला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले.
वेणुगोपाल रावची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती
वेणुगोपाल राव ज्यांनी भारतासाठी 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ते डेक्कन चार्जर्ससह 2009 च्या आयपीएल विजेत्या संघाचा भाग होते. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (2011-13) सोबत आयपीएलचे 3 हंगाम खेळले आहेत. तो दुबई कॅपिटल्सचाही एक भाग राहिला आहे. दुबई कॅपिटल्सच्या उद्घाटनाच्या हंगामात त्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि पुढील हंगामात क्रिकेट संचालक म्हणून काम केले.