India vs Australia 2nd ODI Score: श्रेयस-गिलची शानदार शतकी खेळी, त्यानंतर स्पिनर्सचं जाळं... टीम इंडियानं नेमकं कसं कांगारूंना नमवलं?
India vs Australia 2nd ODI: टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियानं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली.
India vs Australia 2nd ODI Score: टीम इंडियानं (Team India) कांगारूंना (Australia) नमवत दुसरा वनडे सामनाही खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात (India vs Australia 2nd ODI) कांगारूंचा टीम इंडियाच्या शिलेदारांनी दारूण पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (24 सप्टेंबर) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि टीम इंडियानं 99 धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना मोहालीत खेळवण्यात आला होता. ज्यात भारतीय क्रिकेट संघानं 5 विकेट्सनी ऑस्ट्रेलियावर मात केली होती. आता दुसरा सामनाही खिशात घालत टीम इंडियानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाच्या शिलेदांराची शतकी खेळी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून सर्वात आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. सर्वात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 5 विकेट्स गमावत 399 धावांचा मोठा डोंगर ऑस्ट्रेलियासमोर रचला. टीम इंडियानं 2 शतक झळकावली. श्रेयस अय्यरनं 105 धावांची तर शुभमन गिलनं 104 धावांची शानदार खेळी खेळली. त्याव्यतिरिक्त आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये फॉर्म गमावलेला सूर्यकुमार यादव कालच्या सामन्यात मात्र जबरदस्त फॉर्मात दिसला. सूर्यानं नाबात 72 धावा केल्या, त्यात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमरुन ग्रीनच्या ओव्हरमध्ये सूर्यानं लगावलेले 4 षट्कारांची तर बातच न्यारी होती. त्याव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुलनं 52 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अष्टपैलू कॅमेरून ग्रीननं 2 विकेट्स घेतले. याशिवाय जोश हेझलवूड, सीन अॅबॉट आणि अॅडम झाम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.
That's that from the 2nd ODI.
— BCCI (@BCCI) September 24, 2023
Jadeja cleans up Sean Abbott as Australia are all out for 217 runs in in 28.2 overs.#TeamIndia take an unassailable lead of 2-0.#INDvAUS pic.twitter.com/LawVWu2JI8
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेतील सर्वोच्च धावसंख्या
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. टीम इंडियानं 5 गडी गमावून 399 धावा केल्या. नोव्हेंबर 2013 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्स गमावत 283 धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला.
पावसाचा हस्तक्षेप, ऑस्ट्रेलियाला नवं टार्गेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकून तीन एकदिवसीय मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कांगारू संघासमोर 400 धावांचं लक्ष्य होतं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या षटकात सलग 2 चेंडूत 2 विकेट गमावले होते, ऑस्ट्रेलियानं या विकेट्स केवळ 9 धावांत गमावल्या. पावसानं व्यत्यय आणला आणि सामना थांबवावा लागल्यानं ऑस्ट्रेलियन संघाला 9 षटकांत 2 विकेट्सवर केवळ 56 धावा करता आल्या.
सुमारे तासाभरानंतर सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर पावसामुळे सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 17 षटकांचा करण्यात आला. म्हणजेच, ऑस्ट्रेलियाला 33 षटकांत 317 धावांचे लक्ष्य मिळालं. त्यानंतर कांगारूंचा संघ प्रचंड दडपणाखाली होता. टीम इंडियाच्या शिलेदारांनी हेच हेरलं आणि कांगारूंना चौखून हेरण्याची रणनिती आखली. काही काळासाठी कांगारू सामन्यात पुनरागमन करतील असं वाटत होतं, पण टीम इंडियानं ती संधी त्यांना दिलीच नाही. कांगारूंचा संपूर्ण संघ 217 धावांत गडगडला आणि सामन्यासह मालिकाही गमावली. संघाकडून सीन अॅबॉटनं 54 आणि डेव्हिड वॉर्नरनं 53 धावा केल्या. भारताकडून अश्विन आणि जाडेजानं 3-3 बळी घेतले. कृष्णाला 2 विकेट्स घेता आले.
सूर्यकुमारनं मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टी-20 चा नंबर-1 फलंदाज सुर्यकुमार यादव वादळासारखा कांगारू संघावर बरसला. सूर्यानं अवघ्या 37 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्यानं 6 षटकार आणि 6 चौकार लगावले. सूर्यानं केवळ 24 चेंडूंमध्येच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गेल्या काही काळापासून वनडेमध्ये फॉर्म गमावलेल्या सूर्यानं कालच्या सामन्यात कांगारूंना पळता भुई थोडी केली. सूर्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगानं वनडे अर्धशतक झळकावणारा भारतीय ठरला. सूर्यापूर्वी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. सूर्यानं डावाच्या 44व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनच्या ओव्हर्समध्ये सलग 4 षटकारही ठोकले. या षटकात एकूण 26 धावा झाल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील प्लेइंग-11
टीम इंडिया : शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ : डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकिपर), कॅमेरॉन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.