(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA T20: केएल राहुलच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा! जेव्हा- जेव्हा कर्णधारपद सोपवलं, तेव्हा भारतानं गमावलाय सामना
IND vs SA T20: टीम इंडिया विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय.
IND vs SA T20: टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या मालिकेत केएल राहुलकडं भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
विशेष म्हणजे, केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. राहुलनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या चारही सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या पदरात निशाराच पडली. मात्र, असं असतानाही निवड समितीनं केएल राहुलला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी दिलीय.
कर्णधारपदासह फलंदाजीवरही द्यावं लागल लक्ष
टी-20 मालिकेत केएल राहुलच्या कर्णधारपदाची अग्निपरीक्षा आहे. याचबरोबर त्याची फलंदाजीची शैली कशी आहे? हेही पाहावं लागणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात केएल राहुलनं लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आणि संघाला प्लेऑफमध्ये पोहचवलं. या हंगामात केएल राहुलनं 600 हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी केएल राहुलच्या संथ फलंदाजीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. टी-20 मालिकेत राहुलला या उणिवा दूर करण्याची संधी असेल.
टी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी
आयसीसी टी-20 क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतानं मागील सलग 12 सामन्यात विजय मिळवला आहे. भारतानं अफगाणिस्तान (1), नामिबिया (1), स्कॉटलंड (1), न्यूझीलंड (3), वेस्ट इंडिज (3) आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात विजय मिळवला आहे. जर भारतीय संघानं पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर सलग ट-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत तो रोमानिया आणि अफगाणिस्तानला मागं टाकेल.
हे देखील वाचा-