विराटच्या नावावर लवकरच दोन मोठे रेकॉर्ड! टी-20 क्रिकेटमध्ये गाठणार महत्वाचा टप्पा; द्रविडचाही विक्रम मोडणार
India vs Australia: ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
![विराटच्या नावावर लवकरच दोन मोठे रेकॉर्ड! टी-20 क्रिकेटमध्ये गाठणार महत्वाचा टप्पा; द्रविडचाही विक्रम मोडणार IND vs AUS: Virat Kohli Will breaks Rahul Dravid record विराटच्या नावावर लवकरच दोन मोठे रेकॉर्ड! टी-20 क्रिकेटमध्ये गाठणार महत्वाचा टप्पा; द्रविडचाही विक्रम मोडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/19/f4007fb78c02e4f28f0e3b95249b33a2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Australia: नुकतीच पार पडलेल्या आशिया चषकात (Asia Cup 2022) पुन्हा फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर लवकरच दोन मोठ्या विक्रमांची नोंद होणार आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत विराट कोहलीकडं भारताचा माजी कर्णधार आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) विक्रम मोडण्यासह टी-20 क्रिकेटमध्ये महत्वाचा टप्पा गाठण्याची संधी उपलब्ध झालीय.
आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत विराट कोहली 24 हजार 2 धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहलीनं 207 धावा करण्यास यशस्वी ठरल्यास तो राहुल द्रविडचा विक्रम मोडेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड सहाव्या स्थानावर आहे. द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 509 सामन्यात 24 हजार 208 धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिन तेंडुकरच्या नावावर 34 हजार 357 धावांची नोंद आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा
टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून विराट कोहली फक्त 98 धावा दूर आहे. आगामी टी-20 मालिकेत विराटनं 98 धावा काढल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 11 हजारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. कोहलीनं टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 349 सामने खेळले आहेत. ज्यात 40.37 च्या सरासरीनं 10 हजार 902 धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार 470 धावांची नोंद आहे. तसेच भारतीय फलंदाजांच्या तो यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 14 हजार 562 धावांची नोंद आहे. त्यानंतर 11 हजार 893 धावांसह पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड 11 हजार 829 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत विराटची मोठी झेप
आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) दमदार प्रदर्शन करणाऱ्या विराटला 'प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट' म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15व्या स्थानावर पोहोचलाय.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)