Team Australia : ऑस्ट्रेलियन संघात दुखापतींचं सत्र सुरुच, स्टार्क-हेझलवुडनंतर कॅमेरॉन ग्रीनही पहिल्या कसोटीतून बाहेर
IND vs AUS: नागपुर कसोटी सामन्याला सुरु होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक असताना ऑस्ट्रेलियन संघाला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन दुखापतीमुळे सामन्याबाहेर झाला आहे.
IND vs AUS 1st Test : भारताविरुद्धची कसोटी मालिका (India vs Australia) सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या (Team Australia) अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून आधीच बाहेर असताना आता आणखी एक खेळाडू या सामन्याला मुकणार असल्याचं समोर आलं आहे. संघाचा दमदार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) दुखापतीमुळे सामन्याबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) 7 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कॅमेरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता नाही. ग्रीन अद्याप त्याच्या बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती, त्यानंतर ग्रीनला त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया (Cameron Green Injury) करावी लागली.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनीही अष्टपैलू कॅमेरून ग्रीनबद्दल सांगितले होते की, ग्रीनने अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. दुसरीकडे, स्मिथने ग्रीनबद्दल आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, त्याने नेटमध्ये वेगवान गोलंदाजांचा सामनाही केलेला नाही आणि ग्रीनने गोलंदाजीही सुरू केलेली नाही. अशा परिस्थितीत त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे स्मिथने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, ग्रीन प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे आमच्यासाठी तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणं खूप कठीण आहे, परंतु निवडकर्ते पहिल्या कसोटीसाठी एक चांगली प्लेइंग इलेव्हन नक्कीच निवडतील असंही तो म्हणाला.
ग्रीनची कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी
कॅमेरून ग्रीनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 18 कसोटीत 35.04 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये ग्रीनने 29.78 च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या आहेत, यादरम्यान त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 27 धावांत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात या खेळाडूंचा सहभाग :
पॅट कमिन्स (कॅप्टन), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.
हे देखील वाचा-