सेमीफायनलआधी सूर्याला मोठा धक्का, टी20 तं अव्वल स्थान गेलं!
ICC T20 Rankings Rankings : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालाही मोठा झटका बसलाय. हिटमॅन रोहित शर्मा याला चांगला फायदा झालाय. रोहित शर्माने मोठी झेप घेतली आहे.
T20 World Cup 2024 IND vs ENG : टी20 विश्वचषकातील उपांत्य सामन्याच्या लढती गुरुवारी होणार आहेत. भारत आणि इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये आमनासामाना होणार आहे. उपांत्य सामन्याआधी आयसीसीकडून फलंदाजी क्रमवारी जारी कऱण्यात आली आहे. टीम इंडियाचा मिस्टर 360 म्हणजेच सूर्यकुमार यादव याला यामध्ये मोठा धक्का बसलाय. सूर्यकुमार यादव याचं अव्वल स्थान गेलेय. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड आता टी20 मधील अव्वल फलंदाज ठरलाय. सूर्यकुमार यादव याची एका क्रमाने घसरण झाली असून तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
सेमीफायनलआधी सूर्यकुमार यादवला धक्का बसलाय. त्याचं टी20मधील अव्वल स्थान गेलेय. आता ट्रेविस हेड अव्वल स्थानावर पोहचलाय. त्याशिवाय पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालाही मोठा झटका बसलाय. हिटमॅन रोहित शर्मा याला चांगला फायदा झालाय. रोहित शर्माने मोठी झेप घेतली आहे.
टी20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी केली आहे. त्यानं टीम इंडियासाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. पण त्याच्यापेक्षा ट्रेविस हेड यानं शानदार कामगिरी केल्यामुळे अव्वल स्थान गेलेय. सूर्यकुमार यादव आणि हेड यांच्यामध्ये फक्त दोन रेटिंग गुणांचा फरक आहे. ट्रेविस हेड 844 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर पोहचलाय. तर सूर्यकुमार यादव याच्याकडे 842 रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझण याला एका क्रमाने झटका बसलाय, तो चौथ्या स्थानावर पोहचलाय. टीम इंडियाचा युवा यशस्वी जायस्वाल सातव्या स्थानावर कायम आहे, यंदाच्या विश्वचषकात त्याला आतापर्यंत खेळण्याची संधी मिळालेली नाही. तरीही त्यानं आपलं स्थान कायम राखलेय.
रोहित शर्माची मोठी झेप -
टी20 विश्वचषकात वादळी फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला आयसीसी क्रमवारीत फायदा झालाय. कर्णधार रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आता 38 व्या क्रमांकावर पोहचलाय. रोहित शर्माचे 527 रेटिंग गुण आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात 41 चेंडूत 92 धावांची वादळी फलंदाजी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला होता. रोहित शर्मासह विराट कोहलीलाही टी20 क्रमवारीत फायदा झालाय. विराट कोहली 50 व्या क्रमांकावरुन 47 व्या क्रमांकावर पोहचलाय.
उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडविरोधात
टी20 विश्वचषकात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारतीय संघ अजेय आहे. आता उपांत्य फेरीमध्ये भारताचा सामना इंग्लंडविरोधात होणार आहे. गुरुवारी, भारतीय वेळेनुसार, सायंकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना गयाना येथे होणार आहे. गयानाची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक असल्याचे आकडे सांगत आहेत.