(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anshuman Gaikwad Passed Away: दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी
Anshuman Gaikwad: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते.
Anshuman Gaikwad Passes Away: नवी दिल्ली : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad) यांचं कर्करोगानं (Blood Cancer) काल निधन झालं. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी (Cancer) दीर्घ काळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले. पण गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 40 कसोटी आणि 15 वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी बीसीसीआयचे निवड समिती सदस्य आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरला होता.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. अंशुमन यांची अवस्था पाहून कपिल देव (Kapil Dev) यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अंशुमनला मदत करण्यासाठी कपिल देव यांनी आपली पेन्शन दान करण्याचा निर्णयही घेतला होता. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांनीही अंशुमन गायकवाड यांना मदतीचा हात पुढे केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही (BCCI) अंशुमन यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
My deepest condolences to the family and friends of Mr Aunshuman Gaekwad. Heartbreaking for the entire cricket fraternity. May his soul rest in peace🙏
— Jay Shah (@JayShah) July 31, 2024
भारतीय क्रिकेट संघाचा धुरंधर फलंदाज
अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1984 च्या शेवटच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या कोलकाता कसोटीत त्याचा शेवटचा कसोटी सामना होता.
अंशुमन गायकवाडनं 40 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 30.07 च्या सरासरीनं 1985 धावा केल्या, ज्यात 2 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 201 धावा होती, जी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केली होती. गायकवाड यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला, ज्यात त्याच्या नावावर 20.69 च्या सरासरीनं 269 धावांचा रेकॉर्ड आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी
71 वर्षीय अंशुमन यांनी 206 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 41.56 च्या सरासरीनं 12 हजार 136 धावा केल्या होत्या. या कालावधीत त्यांच्या बॅटमधून 34 शतकं आणि 47 अर्धशतकं खेळवण्यात आली होती. फर्स्ट क्लास क्रिकेटमधली त्यांची सर्वोत्तम धावसंख्या 225 धावा होती. याशिवाय, गायकवाड यांनी 55 लिस्ट-ए सामने देखील खेळले, ज्यात त्यांनी 32.67 च्या सरासरीनं एकूण 1601 धावा केल्या.
निवृत्तीनंतर कोचिंगमध्ये करिअर
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंशुमन यांनी कोचिंगला आपलं करिअर म्हणून स्वीकारलं. 1997-99 दरम्यान ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. गायकवाड यांनी गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (GSFC) मध्येही काम केलं आणि 2000 मध्ये या कंपनीतून गायकवाड निवृत्त झाले.
जून 2018 मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. अंशुमन गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड यांनीही कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होते.