IND vs SL : निवड समितीपुढे पेच, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम निवडण्याआधी या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील
Team India Squad for Sri Lanka Tour : भारतीय संघ 27 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. त्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. पण त्याआधी निवड समितीला पाच प्रश्नांची उत्तरे शाधावी लागतील.
India Tour of Sri Lanka 2024 Squad : टीम इंडिया 27 जुलै ते सात ऑगस्ट यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड होणार आहे. पण त्यासाठी निवड समितीच्या डोक्याला ताप झालाय. कारण, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड करण्याआधी पाच प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतील. सिनिअर खेळाडूंना आराम दिला जाईल का? टी20 चा कर्णधार कोण असेल ? टी20 मध्ये भारताचे आघाडीचे तीन फलंदाज कोण? यासारख्या प्रश्नांची उत्तरे निवड समितीला आधी मिळवावी लागतील. पुढील 2 वर्षांत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि T20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात शिलेदारांची निवड करताना निवड समिती खालील प्रश्नांची उत्तरे शोधेल.
1. हार्दिक की सूर्यकुमार, टी20 चा कर्णधार कोण ?
टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिले जात होतं. 2022 टी20 विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी 16 टी20 सामन्यात नेतृत्व केलेय. त्यामध्ये दहा सामन्यात विजय मिळवला. पण हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे सूर्यकुमार यादव याच्याकडे टी20 संघाची धुरा सोपवण्यात आली. सूर्यकुमार यादवने सात सामन्यात पाच विजय मिळवले. हार्दिक पांड्याने सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध 2024 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. तरीही रिपोर्ट्सनुसार सूर्यकुमारला कर्णधार केले जाण्याची शक्यता आहे.
2. टी20 मध्ये भारताचे टॉप 3 फलंदाज कोण ?
झिम्बाब्वेविरोधात यशस्वी जैस्वाल संघात परतल्यानंतर ऋतुराज गायकवाडला ओपनिंग स्लॉट सोडावा लागला. त्यामुळे ऋतुराज गायकवाडचे सलामीचे स्थान धोक्यात आले. ऋतुराजला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागू शकते, असे समोर आलेय. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतच्या कमबॅकमुळे निवड समितीच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 विश्वचषकात पंतला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणं हा फक्त एक प्रयोग होता का? पंतच्या कमबॅकमुळे संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांचे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीलंका दौऱ्यासाठी शिलेदारांची निवड झाल्यानंतर समोर येईल.
3. ऋषभ पंत वनडेमध्ये कमबॅक करणार का ?
ऋषभ पंत टी20 फॉर्मेटमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून स्थान निश्चित झाले आहे. पण केएल राहुल असताना वनडे संघात ऋषभ पंत याला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळेल का? वनडे फॉर्मेटमध्ये केएल राहुलचे महत्त्व खूप जास्त आहे. इतकेच नाही तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल याला कर्णधार बनवण्याचाही विचार आहे. संजू सॅमसन देखील या शर्यतीत आहे, परंतु निवडकर्ते पंत-राहुलच्या डाव्या-उजव्या हाताच्या जोडीने जाऊ शकतात. याचा अर्थ सॅमसनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर राहावे लागू शकते.
4. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं कमबॅक व्हायला हवं का ?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले होते. दोघांनाही टीम इंडियातून स्थान गमवावे लागले. पण आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वात कोलकात्याला चॅम्पियन बनवलं. त्याशिवाय गौतम गंभीरसोबत श्रेयस अय्यरचं ट्युनिंग शानदार आहे. श्रेयस अय्यरने 11 सामन्यात 530 धावा चोपल्या होत्या.
दुसरीकडे, ईशान किशनच्या फॉर्ममध्ये चढ-उतार आले आहेत, पण डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असल्याने त्याला संघात स्थान मिळू शकते.
5. सिनियर खेळाडू संघात कमबॅक करणार का?
श्रीलंकाविरोधात वनडे मालिकेत अनेक सिनियर खेळाडूंना आराम मिळणार असल्याचं सांगण्यात आले. पण नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आगामी मालिकेत सर्व वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती हवी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारताला खूप कमी एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिका खूप महत्त्वाची आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार रोहित शर्मा लवकरच आगामी मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेची माहिती देऊ शकतो.