David Warner Retired: मोठी बातमी: डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; अफगाणिस्तानच्या विजयानंतर घेतला निर्णय
David Warner Retired: अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने यंदाच्या टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आले आहे.
David Warner Retired: टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने यंदाच्या टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (David Warner has retired from international cricket) मात्र, तो आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.
David Warner has retired from international cricket.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
- A legendary career comes to an end, Thank You Davey! ❤️ pic.twitter.com/ny4SUiWivG
डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिड वॉर्नरची कसोटी कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली असली तरी, तो एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खूप यशस्वी ठरला. याशिवाय डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. या खेळाडूच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 जिंकले. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.
डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द-
डेव्हिड वॉर्नरने 112 कसोटी सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये 8786 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 3 वेळी कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे. तर 36 शतक आणि 37 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये 97.26 च्या स्ट्राईट रेटने त्याने 6932 धावा केल्या आहेत. वनडेत डेव्हिड वॉर्नरने 22 शतक आणि 33 वेळा अर्धशतक झळकावले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 139.77 च्या स्ट्राईक रेटने डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी केली. यामध्ये 1 शतक आणि 28 अर्धशतक डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे.
अफगाणिस्तानचा विजय-
आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 08 धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.