Cricket records : एक सामना असाही! नागपुरात अंडर 14 इंटर स्कूल स्पर्धेत 705 धावांच्या फरकाने जिंकला सामना, एकाच सामन्यात झाले अनेक रेकॉर्ड
Cricket Records : नागपुरात अंडर 14 इंटर स्कूल स्पर्धेतील एका सामन्यात अनेक रेकॉर्ड होताना दिसून आले. विशेष म्हणजे सरस्वती विद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्धी सिद्धेश्वर विद्यालयाला 705 धावांच्या तगड्या फरकाने मात दिली.
Nagpur Cricket Match : 40 षटकांच्या सामन्यांमध्ये एखादी टीम किती धावा काढू शकते? एखादा फलंदाज किती चौकार आणि षटकार ठोकू शकतो? समोरची टीम किती धावांवर ऑलआऊट होऊ शकते? असे अनेक विक्रम नागपुरात एकाच सामन्यात होताना दिसून आले. अंडर 14 इंटर स्कूल क्रिकेट स्पर्धेत सरस्वती विद्यालयाने 40 षटकांमध्ये बिनबाद 714 धावा कुटल्या. ज्यानंतर त्यांनी विरोधी संघ सिद्धेश्वर विद्यालयला 5 षटकांत केवळ 9 धावातच सर्वबाद करत तब्बल 705 धावांच्या फरकाने सामना जिंकला. यावेळी सरस्वती विद्यालयाचा फलंदाज यश चौडेने 178 चेंडूत नाबाद 508 धावा ठोकल्या. यशने तब्बल 18 षटकार आणि 81 चौकार लगावले आणि दमदार रेकॉर्ड नावे केले. पण आजही सर्वाधिक धावांचा विक्रम मुंबईच्या प्रणव धनावडे याच्या नावावर आहे. त्याने 1009 धावा 2016 साली केल्या होत्या.
नागपुरात सुरु एमआय ज्युनिअर अंडर 14 इंटर स्कूल क्रिकेट स्पर्धेत हा सामना पाहायला मिळाला. यावेळी सरस्वती विद्यालय आणि सिद्धेश्वर विद्यालय या दोन संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात सरस्वती विद्यालयाने 40 षटकांमध्ये बिनबाद 714 धावा कुटल्या. त्यामध्ये सरस्वती विद्यालयाचा फलंदाज यश चौडेने 178 चेंडूत नाबाद 508 धावा ठोकल्या. त्यासाठी यशने तब्बल 18 षटकार आणि 81 चौकार लगावले. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर सरस्वती विद्यालयाने निर्धारित 40 षटकांत 714 धावांचा विक्रम रचला. यशचा सलामी जोडीदार तिलक वाकोडेनेही नाबाद शतक झळकावले. त्याने 13 चौकारांसह 97 चेंडूत नाबाद 127 धावा केल्या.
एकही विकेट न गमावता इतकी मोठी धावसंख्या एका संघाने उभारल्यावर याच सामन्यात आणखी एक विक्रम झाला. तो म्हणजे या इतक्या मोठ्या धासंख्येचा पाठलाग करताना विरोधी संघ सिद्धेश्वर विद्यालय 5 षटकांत केवळ 9 धावातच गारद झाला. सरस्वती विद्यालयाचा गोलंदाज अंकित गेडेकर ने 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सरस्वती विद्यालयाने हा सामना 705 धावांच्या विक्रमी फरकाने जिंकला. त्यामुळे एकही विकेट न गमावता इतकी मोठी धावसंख्या करणं, इतके चौकार आणि षटकार यासह इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकणं असे अनेक विक्रम यावेळी झाले. दरम्यान शालेय स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मुंबईच्या प्रणव धनावडेच्या नावावर आहे. त्याने 1009 धावा काढल्या होत्या. दरम्यान पंचशतक ठोकणाऱ्या यशमध्ये प्रचंड गुणवत्ता असून भविष्यात त्याचा खेळ आणखी बहरू शकते आणि तो मोठा क्रिकेटर होऊ शकतो असे मत त्याचे प्रशिक्षक रवी कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा-