Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
वादानंतर समय रैनाचे भारतातील अनेक शोज रद्द करण्यात आले. त्यामुळे काही काळ ते विदेशात परफॉर्म करत राहिले.

Samay Raina: कॉमेडियन समय रैनाच्या (Samay Raina) यूट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 1’ काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या शोमधील एका वक्तव्याने मोठी टीका, ट्रोलिंग आणि तक्रारी झाल्या. त्या इतक्या वाढल्या की त्यांना संपूर्ण सीझन डिलीट करावा लागला. मात्र, आता समयने या शोच्या दुसऱ्या सीझनबाबत हिंट दिल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (India's Got Latent Season 2)
अलीकडेच समय रैनाने आपल्या नवीन शोसोबत दमदार कमबॅक केला आहे. दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये ‘इंडियाज गॉट लेटेंट’वरून उठलेल्या वादाबाबतही खुलासे केले . या प्रकरणात त्यांच्यावर अनेक FIR दाखल झाले होते आणि त्यांना कठोर टीकेलाही सामोरे जावे लागले होते.
समय रैनाने दिली दुसऱ्या सिझनविषयी हिंट
लाइव्ह शोदरम्यान समयने सांगितले की या वादाचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम झाला. आपल्या बालपणापासून, मैत्री, कुटुंब आणि लोकांच्या अपेक्षांमुळे निर्माण होणाऱ्या तणावाबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने बोलले. भारतातील कॉमेडियन्सना भेडसावणाऱ्या अडचणी, सततच्या टीकेची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे होणारा त्रास यावरही त्याने भाष्य केले. डीएनएच्या अहवालानुसार, प्रेक्षकांशी बोलताना समय म्हणाला, "शो तर मी परत आणणारच."
रणवीर अल्लाहबादियाच्या प्रश्नामुळे वाढला होता वाद
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीर अल्लाहबादिया, आशीष चंचलानी आणि अपूर्वा मखीजा हे गेस्ट म्हणून आले होते. याच शोमध्ये रणवीरने एका कंटेस्टंटला त्याच्या पालकांबाबत वादग्रस्त प्रश्न विचारल्याने मोठा वाद ओढावला. त्यानंतर केवळ रणवीरच नव्हे, तर समय रैना आणि इतर पाहुण्यांनाही टीका आणि वादांचा सामना करावा लागला. प्रकरण इतके गंभीर झाले की त्यांच्यावर FIR देखील दाखल झाली.
भारतातील अनेक शो रद्द
वादानंतर समय रैनाचे भारतातील अनेक शोज रद्द करण्यात आले. त्यामुळे काही काळ ते विदेशात परफॉर्म करत राहिले. आता पुन्हा एकदा त्यांनी भारतातही शो करण्याची सुरुवात केली आहे. समय रैना देशातील लोकप्रिय आणि चर्चित स्टँड-अप कॉमेडियनपैकी एक म्हणून ओळखला जातो. आता त्याने दिलेल्या या संकेतामुळे ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























