Champions Trophy 2025: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही? क्रीडा मंत्री म्हणाले...
Champions Trophy 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीनं (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केलीय.
Champions Trophy 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीनं (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केलीय. त्यानुसार, पाकिस्तानला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यजमान देश म्हणून घोषित करण्यात आलंय. मात्र, यानंतर भारतात विविध चर्चांना सुरुवात झाली. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचं मत मांडलंय.
अनुराग ठाकूर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, भारत 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार का? असा प्रश्न त्यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, "या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल. तसेच विचार करून हा निर्णय घेतला जाईल. दोन्ही देशातील राजकीय तणावामुळं भारतीय संघानं गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा दौरा केला नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतात, तेव्हा बऱ्याच गोष्टींची चाचपणी करावी लागते. सुरक्षेच्याबाबत पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. यामुळं अनेक देशांनी पाकिस्तानच्या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळं तेथील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो", असेही त्यांनी म्हटलंय.
आयसीसीकडून 2031 पर्यंतच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केलंय. पाकिस्तानला 29 वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेचं यजमानपद मिळलयं. यापूर्वी 1996 च्या विश्वचषकाचं यजमानपद पाकिस्ताननं संयुक्तपणे केलं होतं. पाकिस्तानशिवाय या स्पर्धेचे सामने श्रीलंका आणि भारतामध्येही खेळले गेले.
दरम्यान, श्रीलंकेच्या संघ 2009 मध्ये पाकिस्तानात गेला होता. परंतु, त्यावेळी श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला. ज्यामुळं अनेक क्रिकेट संघ पाकिस्तान दौरा टाळत आहेत. न्यूझीलंड यावर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. मात्र, त्यांनीही मालिका सुरू होण्यापूर्वी सुरक्षेचं कारण सांगून दौरा रद्द केला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-