BCCI President : रॉजर बिन्नी होणार बीसीसीआय अध्यक्ष, सूत्रांची माहिती
BCCI President : बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
BCCI President Election : बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, भारताचा माजी क्रिकेटर आणि 1983 विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी पुढील बीसीसीआय अध्यक्ष होऊ शकतो.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआय अध्यक्ष आहेत. पण 18 ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे सौरव गांगुलीला या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. या पदासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी बीसीसीआयचा अध्यक्ष होऊ शकतात. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी याचं नाव आघाडीवर आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या दिग्गजांची महत्वाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींची चर्चा झाली.
रॉजर बिन्नीची क्रिकेट कारकीर्द -
अष्टपैलू रॉजर बिन्नीनं 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं 27 कसोटी सामन्यात 830 धावा केल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत 11 तर एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत.
रॉजर बिन्नीनं 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स मिळवल्या आहेत. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
सौरव गांगुली निवडणूक लढवणार नाही - रिपोर्ट्स
सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही. जय शाह सचिवपदाची निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. 1983 विश्वचषक विजेत्या संघातील चॅम्पियन खेळाडू रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुल्का यांच्यापैकी एकजण बीसीसीआय अध्यक्ष, सचिव अथवा आयपीएल चेअरमन बनू शकतात. त्याशिवाय सध्याचे कोषाध्यक्ष अरुण ठाकूर पुन्हा एकदा या पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. अरुण ठाकूर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ आहेत.
Former India cricketer Roger Binny frontrunner to replace Sourav Ganguly as next BCCI President, official decision to be taken soon: Sources
— ANI (@ANI) October 7, 2022
(file photos) pic.twitter.com/iOE52UYxCt
दिल्लीमध्ये बीसीसीआयची बैठक -
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्याशिवाय उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल, आयपीएल चेअरमन बृजेश पटेल, माजी सचिव निरंजन शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांची बैठक झाली. बीसीसीआयची पहिली बैठक दिल्लीमधील एका हॉटेलमध्ये पार पडली तर दुसरी बैठकी भाजपच्या दिग्गज मंत्र्यांच्या घरी झाली.