मोहम्मद सिराजच्या दानशूरपणाला अख्ख्या श्रीलंकेचा सलाम, सामनावीर किताब आणि पुरस्काराचे पैसे ग्राऊंड्समनला
India vs Sri Lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
India vs Sri Lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. श्रीलंका संघाला भारतीय संघाने 50 धावांवर तंबूत धाडले. य सामन्यात सिराजने सहा विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला सूरंग लावला होता. सामन्यात सिराज याने सर्वाधिक सहा फलंदाजांना तंबूत धाडले. या दमदार कामगिरीमुळे सिराज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सिराज याने पुरस्काराची रक्कम आणि किताब श्रीलंकेच्या ग्राऊंड्समनला दिला.. सिराजच्या या दानशूरपणाची सध्या चर्चा होत आहे. श्रीलंकन संघ आणि चाहत्यांकडून सिराजचे कौतुक होतेय.
आशिया चषकातील प्रत्येक सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला. तर काही सामने प्रभावित झाले होते. आशिया चषकात पावसाने वारंवार हजेरी लावल्यानंतर येथील ग्राऊंड्समनी जिद्दीने मैदान सुखवली. आशिया चषकात श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफने दाखवलेली जिद्द आणि मेहनत अवघ्या जगाने पाहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि मिळेल त्या साधनाने खेळपट्टी आणि मैदान कोरडे करण्यासाठी स्टाफने केलेली मेहनत आदर्शवत होती. त्यांच्य मेहनतीची आणि जिद्दीची सोशल मीडियावर चर्चा होत होती. सिराज यानेही ग्राऊंड्समनची ही मेहनत जवळून पाहिली होती. त्याने सामनावीर पुरस्कार आणि रक्कम त्या राबणाऱ्या हाताला दिली. सिराजच्या या कृतीचे कौतुक होतेय.
Mohammad Siraj dedicates his Player Of The Match award and cash prize to the Sri Lankan groundstaff.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
- What a beautiful gesture by Siraj! pic.twitter.com/Nt27PEgSk5
आशियाई क्रिकेट परिषदेकडूनही इनाम -
आशियाई क्रिकेट परिषदेकडून श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफला बक्षीस जाहीर करण्यात आलेय. जय शाह यांनी ट्विट करून याबाबत माहित दिली. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांना कोलंबो आणि कॅंडी येथील समर्पित क्युरेटर्स आणि ग्राऊंड्समन यांना 50 हजार अमेरिकन डाॅलरचे योग्य बक्षीस रक्कम जाहीर करताना अभिमान वाटत आहे. त्यांची वचनबद्धता आणि कठोर परिश्रमामुळे आशिया करंडक 2023 एक अविस्मरणीय क्षण ठरला. खेळपट्टीच्या परिपूर्णतेपासून ते चकचकीत आउटफिल्डपर्यंत, त्यांनी थरारक क्रिकेट अॅक्शनसाठी स्टेज तयार करण्यात मोलाची कामगिरी केली. ही ओळख क्रिकेटच्या यशात या व्यक्तींची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते. त्यांच्या सेवेचा सन्मान करूया!
रोहित शर्माकडूनही कौतुकाची थाप
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा ग्राऊंड स्टाफच्या मेहनतीला सलाम करताना कौतुकाची थाप दिली होती. आशिया कपचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोटर्सने ग्राऊंड स्टाफचे कौतुक केले होते व आभार मानले होते. आशिया करंडकमध्ये पावसाने सातत्याने खोडा घातला. त्यामुळे विशेष करून कोलंबो आणि कँडीमधील स्टाफला मैदान पूर्ववत करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली होती.