Ind vs Aus 2nd T20 : दुसऱ्या टी-20 च्या काही तास आधी टीम इंडियाला मोठा धक्का! स्फोटक फलंदाज जखमी, सामन्यातून बाहेर?
भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे.
India vs England 2nd T20I : भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाच्या स्फोटक सलामीवीराला सरावादरम्यान मोठी दुखापत झाली. ज्यामुळे त्याला दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते. कॅचिंग ड्रिल दरम्यान ही दुखापत झाली आणि युवा फलंदाजाचा पाय मुरगळा.
पहिल्या टी-20 मध्ये खेळलेली तुफानी खेळी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माने तुफानी अर्धशतक झळकावले. अभिषेकने 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या होत्या. पण दुर्दैवाने आता त्याला दुसऱ्या टी-20 मधून बाहेर बसावे लागू शकते. नेट सेशनमध्ये कॅचिंग ड्रिल करताना अभिषेकच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर, मैदानावर संघाच्या फिजिओथेरपिस्टने अभिषेकची तपासणी केली. त्यानंतर त्याला आराम देण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले.
लंगडताना दिसला अभिषेक
पॅव्हेलियनमध्ये परतताना तो थोडासा लंगडतानाही दिसला. त्याने नेटमध्ये फलंदाजीही केली नाही. अभिषेकने ड्रेसिंग रूममध्ये फिजिओसोबत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ घालवला. जर अभिषेकला शनिवारी होणाऱ्या सामन्यातून बाहेर बसावे लागले तर भारताकडे वॉशिंग्टन सुंदर किंवा ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय आहे.
सलामीला कोण येणार?
सूर्या अँड कंपनीकडून अभिषेकसोबत संजू सॅमसन फलंदाजीसाठी मैदानात उतरतो. जर अभिषेक 24 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर तिलक वर्मा यांना संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सात विकेट्सने विजय मिळवल्यानंतर भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
7 वर्षांनी चेन्नईत होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 7 वर्षांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत येथे फक्त 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत आणि शेवटचा सामना 2018 मध्ये खेळला गेला होता. येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे, ज्यामध्ये त्यांनी गस अॅटकिन्सनच्या जागी ब्रायडन कार्सेचा समावेश केला आहे.
सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होईल. भारतीय चाहते हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकतात, तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर असेल.