Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Dhule news: धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात सरपंचांनी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
Dhule Crime News: धुळे तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील (Ravindra Patil) व माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोलपंप उभारणीकरिता ना हरकत प्रमाणपत्र (NOC Certificate) देण्यासाठी तडजोडी अंती अडीच लाख रुपये लाचेची (Bribe) मागणी करुन त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
नंदाणे ता.धुळे येथील गट नं. 59/3 येथे तक्रारदाराची शेतजमीन असून या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप (Petrol Pump) उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता कंपनीच्या विभागिय व्यवस्थापकांनी दि.1 सप्टेंबर 2024 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता 5 लाख रुपये लाचेची मागणी केली. तशी तक्रार आज दि. 24 रोजी तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तकारीची धुळे लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाने पडताळणी केली असता सरपंच रविंद्र पाटील यांनी व त्यांच्यासोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 2 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन 1 लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकड दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांनी ते पैसे खिशात ठेवून दिले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिकडे येत दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर सरपंच रविंद्र पाटील आणि अतुल शिरसाठ यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकच्या तपासानंतर या दोघांवर पुढील कारवाई करण्यात येईल.
आणखी वाचा
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात