Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले
Volatile Market Impact: म्युच्यूअल फंड एसआयपी हा गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा अपेक्षाभंग होत असल्याचं दिसून येतं.
SIP Accounts Terminated मुंबई: भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) वाढीचा वेग देखील मंदावला आहे. गेल्या सात तिमाहींपासून जीडीपीचा विकास दर अपेक्षेप्रमाणं दिसत नाही. भारतीय शेअर बाजार सातत्यानं कोसळत आहे. बाजारातील अस्थिर स्थितीचा विचार करता म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांकडून एसआयपी (Mutual Fund SIP) बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साधारणपणे मध्यमवर्गाकडून म्युच्यूअल फंडमधील एसआयपीला प्राधान्य दिलं जातं. मात्र, बाजारातील अस्थिर स्थितीमुलं एसआयपी बंद होत आहेत. डिसेंबरमध्ये एसआयपी खाती विक्रमी संख्येनं बंद झाली. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2024 मध्ये 45 लाख खाती बंद करण्यात आली आहे.ही एखाद्या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.
यापूर्वी मे 2024 मध्ये 44 लाख एसआयपी खाती बंद झाली होती. आता डिसेंबरमध्ये 45 लाख एसआयपी खाती बंद झाली आहेत. गुंतवणूकदारांच्या या भूमिकेमुळं या आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. यापूर्वी एसआयपीचे गुंतवणूकदार बाजारातील घडामोडींमुळं प्रभावित होत नसे, दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे चांगला रिटर्न मिळवण्याचा विचार करत असत. आता मात्र, गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीतून वेल्थ मिळवण्याचा विचार कमी होत असल्याची चिंता शेअर बाजार जाणकारांना वाटत आहे.
नव्या खात्यांच्या संख्येत घट
एसआयपीची खाती केवळ बंद होत नाहीत तर नव्यानं खाती देखील उघडण्याची संख्या कमी होत आहे. डिसेंबर महिन्यात केवळ 9 लाख खाती उघडली गेली. जी गेल्या सात महिन्यांमधील सर्वात कमी होती. एसआयपी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या आधारे दीर्घकालीन कम्पाऊंडिंग रिटर्न पाहतात. मात्र, तरी देखील खाती उघडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
वित्तीय बाजाराच्या जाणकारांच्या मते गुंतवणुकीचा पर्याय निवडण्यातील चूक किंवा कमी सामंजस्यामुळं लोक तोट्याचा व्यवहार करतात. जे लोक वित्तीय बाजारासाठी नवे आहेत त्यांच्याकडून असं होत असतं. शेअर बाजार जाणकाराच्या मते एसआयपी गुंतवणूकदार म्युच्यूअल फंडच्या अलीकडच्या कामगिरीवर आणि वार्षिक रिटर्नच्या आधारे फंडाची निवड करतात. कमी कालावधीमध्ये एखादा फंड चांगली कामगिरी करतो किंवा कामगिरीत घसरण होत असते. काही वेळा चांगलं ट्रॅक रेकॉर्ड असणारा फंड बाजारातील स्थिती किंवा व्यवस्थापनाच्या रणनीतीच्या बदलामुळं घसरतो. अशावेळी गुंतवणूकदारांनी शांततेनं विचार केला पाहिजे. भारतात एसआयपी म्युच्यूअल फंड सध्या चांगल्या स्थितीत असून चांगला परतावा देत आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :
Gold and Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या जर जैसे थे, कोणत्या शहरात नेमका किती दर?