(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आवरा! बांगलादेशच्या खेळाडूला संताप अनावर; भर मैदानात...
क्रिकेटचा सामना म्हटलं, की त्यामध्ये दोन संघांत होणारी स्पर्धा पाहण्याजोगीच ठरते. काही सामने हे त्या क्षणी खेळाडूंच्या कमगिरीमुळं चर्चेचा विषय ठरतात, तर काही सामने मात्र काहीशा दुसऱ्याच कारणांमुळं चर्चेचा विषय ठरतात.
नवी दिल्ली : क्रिकेटचा सामना म्हटलं, की त्यामध्ये दोन संघांत होणारी स्पर्धा पाहण्याजोगीच ठरते. काही सामने हे त्या क्षणी खेळाडूंच्या कामगिरीमुळं चर्चेचा विषय ठरतात, तर काही सामने मात्र काहीशा दुसऱ्याच कारणांमुळं चर्चेचा विषय ठरतात. असाच एक सामना आणि त्यातील एक लहानसा व्हिडीओ क्रीडा वर्तुळात आणि सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
हा सामना आहे बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा. बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुश्फिकर रहीम या त्याच्या खेळासाठी ओळखला जातो. पण, तो अनेक वादांमुळंही चर्चेचा भग ठरतो. अनेकदा हे वाद त्याच्या खेळालाही मागं टाकतात. आता पुन्हा एकदा हा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सुरु असणाऱ्या Bangabandhu T20 Cup मध्ये आपल्या वर्तणुकीसाठी आता तो वादात अडकू शकतो.
आपल्याच संघातील एका खेळाडूवर रहीमचा संताप इतका अनावर झाला, की तो थेट त्याच्या अंगावरच धावून गेला. पण, त्याचं हे संतप्त रुप क्रीडा रसिकांना मात्र काहीसं खटकलं. ज्यासाठी त्याच्यावर आता टीकेची झोड उठवली असून नेटकऱ्यांनी त्याची खिल्लीही उडवली आहे.
Bangabandhu T20 Cup मध्ये Beximco Dhaka या संघाकडून खेळणाऱ्या मुश्फिकर रहीम यानं स्वत:च्याच संघातील खेळाडूवर धावून जात अनेकांचा रोष ओढावला आहे. Fortune Barisal या संघाविरोधातील सामन्यात 17 व्या षटकात अफिफ हुसैन फलंदाजी करत चांगल्या फॉर्ममध्ये असतानाच त्यानं चेंडूला फटका मारला. त्याचवेळी मुश्फिकर तो झेल टीपण्यासाठी पुढं गेला. पण, तितक्यातच नसुम अहमद हा खेळाडूही तो झेल टीपण्यासाठी पुढं झाला.
दोन खेळाडू आणि एक झेल, असं काहीसं चित्र उभं राहिलेलं असतानाच रहिम यानं अखेर हा झेल टीपला. पण त्यानंतर लगेचच मोठ्या आवेगात संतप्त रहीमनं नसुमवर हात उगारला. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये ही बाब अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
Calm down, Rahim. Literally. What a chotu (@imrickyb) pic.twitter.com/657O5eHzqn
— Nikhil (@CricCrazyNIKS) December 14, 2020
मुश्फिकरची अशी वागणूक पाहून संघातील इतर खेळाडूंनी लगेचच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवाय नसुम अहमद या खेळाडूला दिलासा देण्यासाठीही काही खेळाडू पुढं सरसावले. मुख्य म्हणजे या दोन्ही खेळाडूंच्या एमेकांवर आदळण्यामुळं झेल गमावलाच असता. पण, खेळाडूंना दुखापतही झाली असती. असं असलं तरीही संघातील खेळाडूप्रती इतका आवेग फायद्याचा नाही, हेच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून लक्षात येत आहे.