(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shreyanka Patil : भारताच्या अष्टपैलूने 2 धावात घेतल्या 5 विकेट, संपूर्ण संघ 34 धावांवर गारद
Asia Cup 2023 : भारतीय महिला संघाची युवा अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटील हिच्या भेदक गोलंदाजीपुढे हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या 34 धावांत गारद झाला.
Women's Emerging Teams Asia Cup 2023 : भारतीय महिला संघाची युवा अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटील हिच्या भेदक गोलंदाजीपुढे हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या 34 धावांत गारद झाला. महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत श्रेयांका पाटील हिच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हाँगकाँगवर 9 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताच्या महिला ब्रिगेडने अभियानाची सुरुवात दमदार केली. श्रेयांका पाटील हिने या सामन्यात फक्त 2 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या श्रेयांकाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
हॉंगकॉंगमध्ये उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंचा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा 12 जूनपासून सुरू झाली. श्वेता सहरावत भारताची कर्णधार आहे. श्रेयांका पाटील हिने भेदक मारा करत दोन धावांच्या मोबदल्यात हाँगकाँगचा अर्धा संघ तंबूत धाडला. श्रेयांका पाटील हिच्या भेदक गोलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी हाँगकाँग फक्त 34 धावांत गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 5.2 षटकात एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. श्रेयांका पाटील हिला दमदार कामगिरीमुळे प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून गौरवण्यात आले. भारतीय महिला अ संघ या स्पर्धेतील पुढील सामना 15 जून रोजी नेपाळविरोधात खेळणार आहे.
Shreyanka Patil won the Player of the Match for her five-wicket haul in the first match of the Emerging Asia Cup.
— Johns. (@CricCrazyJohns) June 13, 2023
India A won the game by 9 wickets. pic.twitter.com/pzREGpVK3B
20 वर्षीय श्रेयांका पाटील हिच्या फिरकीच्या जाळ्यात हाँगकाँगचा संघ अडकला. अवघ्या 14 षटकात हाँगकाँकचा डाव अवघ्या 34 धावात आटोपला. हाँगकाँगकडून सलामीवीर मारिको हिल हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 19 चेंडूत 14 धावा केल्या. मॅरिको बिलशिवाय हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. कॅरी चान, एलिका हबर्ड, मरियम बीबी आणि बेट्टी चान या चार फलंदाजांना भोपाळाही फोडता आला नाही. भारताकडून श्रेयांका पाटील हिने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. श्रेयांका हिने दोन धावांच्या मोबदल्यात हाँगकाँगचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याशिवाय मन्नत कश्यप हिने दोन धावांत दोन बळी घेतले. तर पार्शवी चोपडा हिने 12 धावांच्या मोबदल्या दोन जणांना तंबूत धाडले. हाँगकाँगने दिलेले 34 धावांचे आव्हान टीम इंडियाने 32 चेंडूत पार केले. भारताकडून त्रिशा हिने नाबाद 19 धावांची खेळी केली.
A day to remember 💙 #grateful pic.twitter.com/l8UNsnKuMt
— Shreyanka Patil (@shreyanka_patil) June 13, 2023