(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आशिया चषकाला गालबोट, पाकिस्तानच्या असिफ अलीनं अफगाणिस्तानच्या खेळाडूवर उगरली बॅट, व्हिडीओ व्हायरल
Asia Cup 2022, PAK vs AFG : आशिया चषकात पाकिस्तान संघानं बुधवारी अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.
Asia Cup 2022, PAK vs AFG : आशिया चषकात पाकिस्तान संघानं बुधवारी अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. रोमांचक सामन्यात अखेरच्या षकटात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला. या सामन्यातील 19 व्या षटकांमध्ये मैदानावरील राडा झाला. पाकिस्तान आणि आफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता. रागाच्या भरात पाकिस्तानचा फलंदाज बॅट घेऊन अफगाणिस्तानच्या गोलंदाजाच्या अंगावर धावला होता. यावेळी दोन्ही खेळाडूमध्ये धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अखेरच्या दोन षटकात सामना रोमांचक स्थितीत पोहचला होता. 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघाची फलंदाजी कोलमडली होती. अशातच 19 व्या षटकात फरीद अहमद (Fareed Ahmad) याने दोन विकेट घेत अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण नसीम शाहने अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. याआधी 19 व्या षटकात फरीद अहमद (Fareed Ahmad) याने आसिफ अली (Asif Ali) याला बाद करत पाकिस्तानला नववा झटका दिला होता. या विकेटमुळे अफगाणिस्तानचा विजय निश्चित मानला जात होता. विकेट पडल्यानंतर फरीद अहमद (Fareed Ahmad) याने सेलिब्रेशन सुरु केले होते. यावेळी असिफ अलीला राग अनावर झाला. त्यानंतर तो बॅट घेऊन फरीदच्या अंगावर धावला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा व्हायरल व्हिडीओ -
The actual video of shameful attitude by this unknown bowler of Afghanistan shoving gestures in the face of Asif Ali. Ungrateful gits! pic.twitter.com/OrFpiEipY3
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) September 7, 2022
फरीद अहमदने विकेट घेतल्यानंतर आपल्या अंदाजात सेलिब्रेशन केले. त्यानंतर आसिफ एकदम फरीदच्य जवळ पोहचला. त्यावेळी दोन्ही खेळाडूमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्याचवेळी आसिफ अलीने फरीदला बॅट उगारली. दोन्ही खेळाडूमध्ये गरमागरमीचं वातावरण पाहून अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद सोडवला.
The fight between Asif Ali and the Afghan bowler💥 Very unfortunate
— Nadir Baloch (@BalochNadir5) September 7, 2022
#PAKvAFG pic.twitter.com/AQzxurWNB7
पाकिस्तानचा एक विकेटने विजय -
अफगाणिस्ताननं दिलेलं 130 धावांचं आव्हान पाकिस्ताननं अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केलं. वेगवान गोलंदाज नसीम शाहनं दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानने फायनलच तिकिट पक्कं केले आहे. पाकिस्ताननं नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. इब्राहिम झद्रान याच्या 35 धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तान संघानं निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 129 धावांपर्यंत मजल मारली होती. हजरतुल्ला झझाई, रहमानुल्ला गुरबज, करीम जनत, नजीबुल्लाह जद्रान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून हॅरिस रऊफने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अफगाणिस्ताननं दिलेल्या 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. कर्णधार बाबर आझम एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर फखर जमानही तंबूत परतला. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावेली पुन्हा एकदा रिझवानने संयमी फलंदाजी केली. रिझवान बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव ढासळतोय असे वाटत होते. पण शदाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी सामना फिरवला. शदाब खानने 30 तर अहमदने 36 धावांची खेळी केली. याच वेळी मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत एकापाठोपाठ एक विकेट घेतल्या. अखेरच्या 6 चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 12 धावांची गरज होती. आणि हातात फक्त एक विकेट... त्यावेळी गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार मारत सामना जिंकून दिला.