(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK: अफगाणिस्तानमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष, चाहत्याने चक्क TV स्क्रीनवरच घेतली पांड्याची पप्पी
Hardik Pandya Asia Cup 2022 : भारताने स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली. हार्दिकने 3 विकेट्स घेत महत्त्वपूर्ण 33 रनही केले.
IND vs PAK : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत 2022 (Asia Cup 2022) रविवारी रात्री झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं तुफान आलचं पण जगभरातील क्रिकेटप्रेमी एका रोमहर्षक सामन्याचे साक्षीदार ठरले. यावेळी अफगाणिस्तानमध्येही काही क्रिकेटप्रेमींनी भारताचा विजय अगदी मनापासून साजरा केला. यावेळी एका चाहत्याने हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) विजयी षटकारावर थेट TV स्क्रिनवर पांड्या असताना त्याला किस दिल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण भारत-पाकिस्तान सामना पाहताना दिसत आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला तेव्हा यातील एक तरुण उठून भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसतो. तो थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर जातो आणि हार्दिक पांड्याला किस करतो. यावेळी खोलीत उपस्थित बाकीचे तरुण हसताना दिसत आहेत.
पाहा VIDEO
सामन्याचा लेखा-जोखा
सामन्यात आधी भारतानं (Team India) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पाकिस्ताननं 147 धावा केल्या. यावेळी मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावा पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या ठरल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 तर हार्दिक पांड्याने 3, अर्शदीपने 2 आणि आवेश खाननं एक विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला.
यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं. भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.
हे देखील वाचा-