37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे महाराष्ट्र अग्रस्थानी!
37th National Games : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्र अग्रस्थानी कायम आहे.
37th National Games : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्र अग्रस्थानी कायम आहे. हरयाणा आणि गतविजेत्या सेनादल यांना महाराष्ट्राच्या क्रीडपटूनी तोलामोलाची टक्कर देत मात केली आहे. महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण १४ पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने निर्भेळ यश मिळवताना पाच सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. कोमल वाकळेने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या ८७ किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच तलवारबाजीत महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले. याचप्रमाणे पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकांची कमाई केली. महाराष्ट्राने शनिवारी १७ सुवर्ण, ८ रौप्य, ७ कांस्य अशा एकूण ३३ पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खात्यावर आता ४२ सुवर्ण, २५ रौप्य, २६ कांस्य अशी एकूण ९४ पदके जमा आहेत.
संयुक्ताची लक्षवेधी कामगिरी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला एकूण पाच पदके
संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. यात संयुक्ताने एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवून वर्चस्व गाजवले. रिचाने आज दोन कांस्य पदके पटकावली.
मापूसा येथील पेड्डेम इनडोअर स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील क्लब प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने सुवर्णपदकाला गवसणी घालताना २४.३० गुण मिळवले, तर सहकारी रिचा चोरडियाने २०.३० गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. हरयाणाच्या लाइफ अडलखाला (२३.११ गुण) रौप्य पदक मिळाले. रिबन प्रकारात संयुक्ताने २३.१५ गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. तर रिचाने २०.१५ गुणांच्या सहाय्याने कांस्य पदक पटकावले. हरयाणाच्या लाइफने (२३.७० गुण) सुवर्ण पदक मिळवले. महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात इशिता रेवाळेला (११.१०० गुण) कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले. पश्चिम बंगालच्या प्रणती दासला (११.५३३ गुण) सुवर्ण आणि ओडीशाच्या प्रणती नायकला (११.४०० गुण) रौप्य पदक मिळाले. बॅलन्सिंग बिम प्रकारात इशिता रेवाळेला (१०.००० गुण) पाचव्या आणि रिद्धी हत्तेकरला (९.९६७ गुण) सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील टेबल व्हॉल्ट प्रकारात आर्यन दवंडेला (१२.८३४ गुण) सहावा क्रमांक, तर सिद्धांत कोंडेला (१२.३६७ गुण) आठवा क्रमांक मिळाला. हॉरिझंटल बार प्रकारात सिद्धांतला सहावा क्रमांक मिळाला.
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राला निर्भेळ यश, पाच सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने निर्भेळ यश मिळवले. त्यांनी शनिवारी पाच सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. फोंडा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मिश्र रिले स्पर्धेत महाराष्ट्राच्या मानसी मोहिते व पार्थ मिरगे यांनी सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत ८०० मीटर्स धावणे, नंतर १०० मीटर्स पोहणे व पुन्हा ८०० मीटर्स धावणे या तीन शर्यतींचा समावेश होता. त्यांनी १२ मिनिटे १२.७२ सेकंदांत ही शर्यत जिंकली. मानसीने वैयक्तिक बाएथलॉन शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत १६०० मीटर्स धावणे, नंतर २०० मीटर्स पोहणे, पुन्हा १६०० मीटर्स धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तिने ही शर्यत १४ मिनिटे ६.२७ सेकंदांत पार केली. तिची सहकारी डॉली पाटील हिने रौप्य पदक जिंकताना १४ मिनिटे १३.६१ सेकंद वेळ नोंदवली. मानसी व डॉली यांनी सिद्धी धनावडेच्या साथीत महाराष्ट्रात सांघिक विभागात विजेतेपद मिळवून दिले.
पुरुषांच्या विभागातील बाएथलॉन शर्यतीत पार्थ मिरगे याने वैयक्तिक विभागात सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत सोळाशे मीटर्स धावणे नंतर २०० मीटर्स पोहणे पुन्हा १६०० मीटर्स धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. हे अंतर पार करण्यास त्याला बारा मिनिटे ५६.१२ सेकंद वेळ लागला त्याचा सहकारी अंगद इंगळेकर यांनी हे अंतर बारा मिनिटे ५७.५९ सेकंदात पार करीत रौप्य पदक पटकावले. पार्थ व अंगद यांनी कौशिक मलांडकर यांच्या साथीत महाराष्ट्रास सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. ज्येष्ठ प्रशिक्षक व संघटक सुनील पूर्णपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये या क्रीडा प्रकारात येथे आतापर्यंत दहा सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई केली आहे.
मल्लखांब -रुपाली गंगावणेचा सोनेरी चौकार; महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदके
पारंपारिक खेळ प्रकारात आपला दबदबा कायम ठेवताना महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात शनिवारी नऊ सुवर्णपदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. गुणवंत युवा खेळाडू शुंभकर, कृष्णा, दीपक, अक्षय आणि ऋषभने मल्लखांबमध्ये सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्राला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले. हीच लय कायम ठेवताना दीपक शिंदेने वैयक्तिक गटात विजेतेपदाचा पराक्रम गाजवला. तसेच याच गटात महाराष्ट्राचा शुभंकर खवले हा कांस्यपदक विजेता ठरला. रुपालीने महिलांच्या वैयक्तिक गटाचा किताब आपल्या नावे केला. महाराष्ट्र पुरुष संघ पहिल्यांदाच मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. या संघाने अंतिम फेरीमध्ये १२८.७० गुणांची कमाई केली. स्वप्निल आणि प्रणाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले आहे. पुरुष गटात मध्य प्रदेश संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच छत्तीसगड संघ कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र पुरुष संघाने सांघिक गटात सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे संघाला हा सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.
पदक विजेते
सुवर्ण : दीपक शिंदे (वैयक्तिक)
सुवर्ण : रुपाली गंगावणे (वैयक्तिक)
सुवर्ण :रुपाली गंगावणे (रोप मल्लखांब)
सुवर्ण : रुपाली गंगावणे (पोल मल्लखांब)
सुवर्ण : अक्षय तरल (रोप मल्लखांब)
सुवर्ण : अक्षय तरल (पोल मल्लखांब)
सुवर्ण : शुभंकर खवले (हँगिंग मल्लखांब)
रौप्य : जान्हवी जाधव (पोल मल्लखांब)
रौप्य : नेहा क्षीरसागर ((रोप मल्लखांब)
कांस्य : दीपक शिंदे (पोल मल्लखांब)
कांस्य : दीपक शिंदे (हँगिंग मल्लखांब)
कांस्य : शुभंकर खवले (वैयक्तिक)
मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचा विक्रम : शिरगावकर
मल्लखांब खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विक्रमाला गवसणी घातली. यामुळे संघाला या क्रीडा प्रकारात आपला दबदबा कायम ठेवता आला. युवा खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी करताना महाराष्ट्राला ९ सुवर्णांसह १४ पदकांचा बहुमान मिळवून दिला. ही निश्चितपणे सर्वोत्तम कामगिरी ठरली, अशा शब्दांत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी पदक विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
वेटलिफ्टिंग -कोमल वाकळे सुवर्णपदकाची मानकरी
कोमल वाकळेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील महिलांच्या ८७ किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. कोमलने स्नॅचमध्ये ९३ किलो तर क्लीन-जर्कमध्ये ११२ किलो असे एकूण २०५ किलो वजन उचलले. कोमलने स्नॅचमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ९६ किलो वजन उचलण्याच्या केलेला प्रयत्न अपयशी ठरला. कर्नाटकच्या उषा बीएनने २०३ किलो (स्नॅच ९५, क्लीन-जर्क १०८) वजन उचलून रौप्य पदक मिळवले, तर हरयाणाच्या राखीने १९६ किलो (स्नॅच ८७, क्लीन-जर्क १०९) वजन उचलून कांस्य पदक पटकावले.
कोल्हापूरच्या आदित्य अनगळला वाढदिवसाची भेट
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तलवारबाजी क्रीडा प्रकारात शनिवारी महाराष्ट्राच्या सॅब्रे संघाने रुपेरी यश संपादन केले. अंतिम सामन्यांत महाराष्ट्र संघाला सेनादल संघाकडून ३४-४५ असे पराभूत व्हावे लागले. महाराष्ट्राच्या संघात आदित्य अनगळ, अभय शिंदे, धनंजय जाधव व निखिल वाघ यांचा समावेश होता. कोल्हापूरचा खेळाडू आदित्य अनगळला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारबाजीमधील रौप्य पदकाची ही भेट मिळाली. शुक्रवारी अभय शिंदेने पदकांची सॅब्रे वैयक्तिक विभागात कांस्य पदक जिंकले, तर ईपी प्रकारातील वैयक्तिक विभागात गिरीश जकातेने कांस्य पदक पटकावले होते.
पिंच्याक सिल्याट -वैभव काळेला सुवर्ण
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पिंच्याक सिल्याट क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने शनिवारी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकांची कमाई केली. वैभव काळेने सुवर्ण पदक जिंकून क्रीडारसिकांची मने जिंकली. वैभवने ६०-६५ किलो टँडिंग प्रकारात अंतिम सामन्यात चंडीगडच्या शुभमला हरवून जेतेपद मिळवले. ६०-६५ किलो वजनी गटात सोमनाथ सोनावणेने उत्तराखंडच्या निखिल भारतीकडून पराभव पत्करल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ६०-६५ वजनी गटात किर्णक्षी येवलेने आसामच्या लकी दासकडून पराभूत झाल्याने तिला कांस्य पदक मिळाले. पुरुषांच्या ९०-९५ किलो वजनी गटात पियुष शुकलाला कांस्य पदक मिळाले.