स्पर्धा परीक्षांची तयारी सुलभ व्हावी यासाठी MM Academy App लॉन्च, यवतमाळच्या तरुणाचा प्रयोग
यवतमाळच्या मयूर मोगरे या तरुणाने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरळ आणि सुलभ भाषेत एमएम अकॅडमी ॲप लॉन्च केलं आहे.
यवतमाळ: सर्वसामान्य कुटुंबातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आज अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. परंतु अपुरी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने कठोर परिश्रम करून देखील ते आपले ध्येय गाठू शकत नाही. प्रत्येक सर्वसामान्य गरजू आणि गरीब कुटुंबात अधिकारी निर्माण व्हावा हाच उद्देश घेऊन यवतमाळच्या मयूर मोगरे तरुणाने अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत एक एमएम अकॅडमी ॲप लॉन्च केलं आहे. ज्या माध्यमातून आता शेकडो स्पर्धा परीक्षार्थी आपले ध्येय गाठू शकणार आहे.
मयूर मोगरे हा यवतमाळ येथे राहतो. मयुरने आपले शालेय आणि महाविद्यालय शिक्षण यवतमाळ येथे पूर्ण केले आहे. त्यानंतर यवतमाळच्या जगदंबा इंजिनीयर कॉलेजमधून तो एमई झाला असून त्याची पीएचडी सुरू आहे. 2016 पासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि यूट्यूबच्या माध्यमातून तो मार्गदर्शन करतो आहे. याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उच्च शिक्षण घेत असतानाच त्याने एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुद्धा केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येत असल्याचं त्याला जाणवलं. आज विद्यार्थी आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. याकरता लाखो रुपये आपल्या शिकवणीवर खर्च करीत आहे. मात्र अभ्यास करण्याच्या पद्धती आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आज सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्येक घरात अधिकारी घडावा हा उद्देश लक्षात घेऊन मयुरने दोन वर्षांपूर्वी एक ॲप तयार केलं. अतिशय माफक दरात सरळ आणि सोप्या भाषेत हे ॲप असल्याचे मयूरने सांगितले आहे.
का वाटली अँपची गरज?
मयूर हा शिक्षणासाठी बाहेरगावी असताना एका ठिकाणी राहायचा. त्यावेळी त्याच्या रूमवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दिवसा काम आणि रात्री अभ्यास करायचे. विद्यार्थ्यांची ही तळमळ पाहून त्याने कामावरून परतल्यानंतर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. मयूरची शिकवणी सर्व विद्यार्थ्यांना देखील आवडली. त्यानंतर त्यांने आपल्या शिकवणीचे व्हिडीओ बनवून यूट्यूबवर टाकायला सुरू केले. विशेष म्हणजे यूट्यूबवरदेखील मयूरला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ॲपची वैशिष्ट्ये
प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता ही वेगवेगळी आहे. त्यानुसार त्यांना शिकवण्याची गरज आहे. व्यायाम शाळेत ज्याप्रमाणे एखाद्या ट्रेनरची गरज असते. त्याचप्रमाणे या ॲपद्वारे विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे ॲप तयार करण्यात आलं आहे. विद्यार्थी किती लक्षात ठेवू शकतो, त्याची क्षमता काय आहे, विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवण्याची गरज आहे या सर्व बाबी गृहीत धरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या ॲपद्वारे मदत केली जाते.