(Source: ECI/ABP News/ABP Majha)
China President : कोण होणार चीनचे नवे राष्ट्राध्यक्ष? शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार?
China President Election 2022 : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यानंतर पुढील राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल.
China President Election 2022 : चीनमध्ये (China) राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचा कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टीची (CCP) बैठक 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये पुढील राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल. चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. आता पुन्हा तिसर्यांदा शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष होणार का हे पाहावं लागेल.
शी जिनपिंग यांना ली केकियांग यांचं आव्हान
यावेळच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत शी जिनपिंग (Xi Jinping) यांची ली केकियांग (Li Keqiang) यांच्यासोबत लढत होण्याची शक्यता आहे. ली केकियांग हे चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. पॉलिटब्युरो संस्था कम्युनिस्ट पक्षाची कार्यकारी समिती आहे. पॉलिटब्युरोच्या सात सदस्यीय स्थायी समितीमध्ये केकियांग यांचा समावेश आहे. पॉलिटब्युरोच्या सात सदस्यीय स्थायी समितीमध्ये शी जिनपिंग, ली केकियांग, वांग हुनिंग, वांग यांग, ली झांसू, झाओ लेजी आणि हाँग झेंग यांचा समावेश आहे.
पॉलिटब्युरो काय आहे?
पॉलिटब्युरो संस्था चायनीज कम्युनिस्ट पार्टीची (CCP) कार्यकारी समिती आहे. पॉलिटब्युरो ही चीनमधील सर्वात शक्तिशाली संस्था आहे, यामध्ये 25 सदस्य आहेत. तर याच्या स्थायी समितीमध्ये सात सदस्य आहेत. या सात सदस्यांकडे चीनसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या सदस्यांना चीनमधील स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या समितीमध्ये समाविष्ट असल्याने, पॉलिट ब्युरोच्या सात सदस्यांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष होण्याची क्षमता आहे. त्यानुसार ली केकियांग यांच्याशिवाय इतरांनाही अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार मानलं जाऊ शकतं.
केकियांग हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत
ली केकियांग हे शी जिनपिंग यांना स्पर्धा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या काही वर्षांत चीनमधील लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. चीनचा राष्ट्राध्यक्ष निवडण्यात जनतेचा हात नसला तरी कोरोनाच्या काळात चीन सरकारच्या कठोर धोरणांमुळे देशाला आणि देशवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागलं. त्यामुळे जनतेमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष वाढला आहे, असे दावे मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आले आहेत.
चीनच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक अशीच होते
चीनच्या राष्ट्राध्यक्षाची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे 3000 प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये 200 सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील 25 सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष म्हणूनही निवड करतात.