Monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचा वाढता उद्रेक, जाणून घ्या भारतासह जगभरातील सध्याच्या परिस्थितीबाबत
WHO On Monkeypox : जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जाहीर केलं आहे. हा विषाणू संसर्ग जगभरात 74 देशांमध्ये पसरला आहे.
Monkeypox Global Health Emergency : भारतात कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox Virus) संसर्गाचाही धोका वाढताना दिसत आहे. तेलंगणामध्ये नवीन संशयित रुग्ण आढळला असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतील. त्याआधी रविवारी दिल्ली मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. यासह भारतातील मंकीपॉक्स विषाणूच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जाहीर केलं आहे. हा विषाणू संसर्ग जगभरात 74 देशांमध्ये पसरला आहे.
विषाणूजन्य मंकीपॉक्स आजार जगभरातील 74 देशांमध्ये वेगाने पसरताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'मी मंकीपॉक्स संसर्ग जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचं जाहीर करत आहे.' जगभरातील सुमारे 17,000 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
जगभरात 74 देशांमध्ये मंकीपॉक्सचा शिरकाव
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) एका रिपोर्टनुसार, मंकीपॉक्स विषाणू जगभरात 74 देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत 74 देशांमधील 16 हजार 800 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून पश्चिमेकडील देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आफ्रिकन देशांमध्ये आधीपासूनच या रोगाचं संक्रमण झालेलं आहे.
भारतात मंकीपॉक्सचे चार रुग्ण
भारतात आतापर्यंत चार रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात तीन रुग्णांची नोंद झाली होती. याआधी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.