अमेरिकेच्या कारवाईत इसिसचा म्होरक्या अबू अल बगदादी ठार?
इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा खात्मा केल्याचं वृत्त अमेरिकेतून येत आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटलं की, काहीतरी मोठं घडलं आहे. त्यामुळे नक्की काय घडलंय याची लोकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
वॉशिंग्टन : दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा खात्मा केल्याचं वृत्त अमेरिकेतून येत आहे. अमेरिकेने सीरियामध्ये केलेल्या एका कारवाईत बगदादी ठार झाल्याची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिली आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने हे यशस्वी ऑपरेशन राबवलं आहे. या ऑपरेशनमध्ये बगदादीला ठार करण्यात आल्याची माहिती आहे. सीरियातील इदबिल प्रांतात एका विशेष ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Something very big has just happened!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 27, 2019
यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी 6.53 एक ट्वीट केलं. ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडलं आहे, असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बगदादी मारला गेल्याच्या अनेक बातम्या याआधीही आल्या आहेत. मात्र इसिसने नेहमीच या बातम्यांचं खंडन केलं आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात बगदादीचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत बगदादीने श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बगदादीने म्हटलं होतं की, इसिसच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याच्या बदल्यात श्रीलंकेत हल्ला केला आहे. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन-तीन दहशतवादी दिसत होते.