(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Elections : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती; भारताशी त्यांचा काय संबंध?
US Elections : हॅरिस यांचा अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. कमला हॅरिस यांनी 21 जानेवारी, 2019 रोजी 2020 मधील राष्ट्रपती निवडणुक लढणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांनी 3 डिसेंबर रोजी राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीतून आपलं नाव मागे घेतलं. तेव्हापासून त्यांनी बायडन यांना समर्थन दिलं.
US Elections : संपूर्ण जगाचं लक्षं लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात करत निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच या निवडणुकीत पहिल्यांदाच अमेरिकेला एक महिला उपराष्ट्रपती मिळाल्या आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जिंकली आहे. जाणून घेऊया पहिल्यांदाच जगाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या महिला उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळणाऱ्या कमला हॅरिस यांचा आतापर्यंतचा प्रवास...
Photo Credit : @kamalaharris/ Instaकोण आहेत कमला हॅरिस?
कमला हॅरिस यांची आई भारतीय आणि वडिल जमेकाई वंशाचे आहेत. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म 1964 मध्ये ऑकलँडमध्ये भारतीय वंशाच्या श्यामला गोपालन हॅरिस आणि जमेकाई वंशाचे वडिल डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला. त्यांचे वडिल स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि आई स्तन कॅन्सर या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक होत्या. कमला हॅरिस यांच्या वडिलंपासून विभक्त झाल्यानंतर कमला यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे त्या आपल्या आईसोबत भारतात येत असतं.
While I may be the first woman in this office, I will not be the last—because every little girl watching tonight sees that this is a country of possibilities.
— Kamala Harris (@KamalaHarris) November 8, 2020
हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला आहे. त्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या आणि तिकडेच स्थायिक झाल्या. कमला यांना घेऊन त्या नेहमी आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात यायच्या. कमला यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे नंतरच्या काळात चेन्नईला स्थायिक झाले. आपण पाच वर्षाचे असताना आजोबांसोबत थुलसेद्रपूरम या मूळ गावी फेरफटका मारल्याचे कमला यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सांगितले होते.
आपल्या आई-वडिलांप्रमाणेच कमला हॅरिसही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी 1998 मध्ये ब्राउन युनिवर्सिटीमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया युनिवर्सिटीमधून कायद्याची पदवी मिळवली. तसेच त्यानंतर त्यांनी फ्रांसिस्को डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिस जॉईन केलं. जिथे त्यांना करियर क्रिमिनल यूनिटचं इंचार्ज केलं होतं.
पाहा व्हिडीओ : जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष
कमला हॅरिस यांचा आतापर्यंतचा प्रवास
हॅरिस यांचा अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांची सर्वातआधी 2003 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या काउंटीच्या डिस्ट्रिक अटॉर्नी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल म्हणून काम पाहत होत्या. हॅरिस यांनी 2017 मध्ये कॅलिफोर्नियातून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. असं करणाऱ्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला होत्या. त्यांनी होमलँड सिक्योरिटी अँन्ड गवर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजेंस सिलेक्ट कमिटी, ज्यूडिशियरी कमिटी आणि बजेट कमिटीमध्येही काम केलं आहे.
आपल्या कामामुळे त्यांनी अनेक लोकांची मनं जिंकली आणि त्यामुळेच लोकांमध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. खासकरून त्यांच्या भाषणांना 'ब्लॅक लाइव्स मॅटर' अभियाना दरम्यान लोकांचं मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालं. हॅरिस सिस्टमॅटिक नक्षलवाद संपवण्याच्या हेतू समोर ठेवून नेहमी बोलत असतात.
कमला हॅरिस यांनी 21 जानेवारी, 2019 रोजी 2020 मधील राष्ट्रपती निवडणुक लढणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, त्यांनी 3 डिसेंबर रोजी राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीतून आपलं नाव मागे घेतलं. तेव्हापासून त्या बायडन यांच्या समर्थक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :