Shashi Tharoor : अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील, ट्रम्प-मुनीर लंचनंतर शशी थरुर यांनी दाखवला आरसा
Shashi Tharoor:काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यातील लंचवरुन अमेरिकेला आरसा दाखवला आहे.

Donald Trump Asim Munir Lunch: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यातील लंचवरुन काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले भोजन चांगलं झालं असेल या दरम्यान त्यांना विचार करता आला असेल. शशी थरुर यांनी अमेरिकेतील लोकांना ओसामा बिन लादेनची आठवण देखील करुन दिली.
अमेरिकेचे लोक ओसामा बिन लादेनला विसरले नसतील
शशी थरुर यांनी म्हटलं की मला आशा आहे की, अमेरिकेनं या भेटींमध्ये पाकिस्तानला आठवण करुन दिली असेल की दहशतवाद्यांना त्यांच्या देशातून आमच्या देशात पाठवणं, त्यांना मार्गदर्शन देणं, प्रशिक्षण देणं, शस्त्र देणं, फंड देणं, उपकरण देणं आणि पाठवण्यामध्ये सक्षम नाहीत. ओसामा बिन लादेन प्रकरण इतक्या लवकर अमेरिकेचे लोक विसरु शकणार नाहीत, असं शशी थरुर म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचं क्रेडिट स्वत:ला दिलं आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर बोलताना शशी थरुर म्हणाले की मध्यस्थीचा अर्थ समानता असा होतो. ते म्हणाले दहशतवाद्यांना पाठवणाऱ्यांमध्ये आणि दहशतवाद्यांचा बिमोड करणाऱ्यांमध्ये कोणतीही समानता नसते.
मध्यस्थीच्या दाव्यावर ट्रम्प यांना दाखवला आरसा
शशी थरुर यांनी म्हटलं की, आम्ही स्पष्ट केलेलं की जर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्याचं उत्तर देऊ, हा संदेश फक्त पाकिस्तानला दिला नव्हता तर संपूर्ण जगाला दिलेला होता. जर भारत सरकार आणि सैन्यदलानं दररोज केलेलं ब्रीफिंग पाहिलं असता कळेल की आम्ही युद्ध रोखण्यासाठी कुणाला विनंती करण्याची गरज नव्हती.
मध्यस्थीसाठी आम्ही विनंती केली नव्हती...
काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले, जर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून कुणावर दबाव असेल तर तो पाकिस्तान आणि त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर होता. आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजेत. अमेरिकेनं त्यावेळी पाकिस्तानवर जो बदाव टाकले असेल त्यासाठी आम्ही काही सांगितलं नव्हतं. आम्ही कुणाला मध्यस्थीसाठी विनंती केली नव्हती. आम्ही अमेरिकेत शिष्टमंडळाच्या बैठकीत हे समजावून सांगितलं होतं, त्यावेळी ते पूर्णपणे समजलं, असं शशी थरुर म्हणाले.
अमेरिकेच्या प्रशासनाला सर्व माहीत : शशी थरुर
मी सर्वांना आश्वस्त करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला जो रिपोर्ट दिला होता तो संदेश आम्ही जगाला दिला आहे. व्यक्तिगतपणे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत चर्चा केली आहे. आम्ही या गोष्टी सार्वजनिकपणे न सांगता राजनैतिक प्रकारे सांगितल्या आहेत. आता मी त्या गोष्टी सार्वजनिक पणे सांगतो. अमेरिकेच्या प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, मध्यस्थीच्या मुद्यामध्ये भारत कुठं उभा आहे, असं शशी थरुर म्हणाले.























