Russia Ukraine War : युक्रेनचे खेरसर शहर पडले? रशियन फौजांनी शिरकाव केल्याची महापौरांची माहिती
Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पोर्टमध्ये अद्याप युद्ध सुरू असल्याचं म्हटलं आहे.
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. रशिया एकापाठोपाठ एक युक्रेनमधील शहरांचा ताबा मिळवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेरसेनच्या महापौरांनी रशिय पोर्ट शहर काबीज करण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पोर्टमध्ये अद्याप युद्ध सुरू असल्याचं म्हटलं आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्स आणि एपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, खेरसन शहरावर रशियानं पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. खेरसनचे महापौर इगोर कोलीखाएव (Igor Kolykhaev) म्हणाले की, रशियन सैनिकांनी शहरात प्रवेश केला आहे. अशात महापौरांनी रशियन सैन्याकडे स्थानिक नागरिकांना गोळ्या घालू नये, अशी विनंती केल्याचंही महापौरांनी सांगितलं आहे.
"मी त्यांना फक्त लोकांवर गोळीबार करू नका असे सांगितले," महापौर इगोर कोलीखाएव यांनी एका निवेदनात म्हटले आहे. आमच्याकडे शहरात कोणतेही युक्रेनियन सैन्य नाही, फक्त नागरिक आहेत. जे इथे राहतात, असंही त्यांनी सांगितलं आहे.
खेरसन युक्रेनमधील बंदरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. हे जवळपास 300,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. हे शहर काळ्या समुद्राजवळून वाहणाऱ्या नीपर नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. जर रशियन सैन्यानं या शहराचा पूर्णपणे ताबा घेतला, तर जवळच असलेल्या कालव्यातून बंद झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल. त्याशिवाय रशिया क्रीमिया भागात युक्रेन सरकारनं बंद केलेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करु शकतं.
युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप
युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप रशियाने केला आहे. खारकीव्हमधून या विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर पडू देत नसल्याचे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी रशियन सैन्य मदत करणार असल्याचे रशियन दूतवासाने म्हटले आहे. मागील सात दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
भारतातील रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती माध्यमांनी दिली. या माहितीनुसार, युक्रेनमधील खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोद येथे जायचे आहे. मात्र, युक्रेनकडून या विद्यार्थ्यांना अटकाव करण्यात आला असून ओलीस ठेवले आहे. युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून या विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत रशियात जाण्यापासून अडवले जात आहे. या प्रकारासाठी युक्रेनचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha