Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Beed Crime: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई: धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या कंपनीला राज्य शासनाच्या महाजेनकोकडून कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करुन घेतला. हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचे उल्लंघन आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद सोडा, त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले. अंजली दमानिया यांनी बुधवारी मुंबईत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले.
मी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यांना बीडमधील परिस्थिती, दहशत या सगळ्याविषयी सांगितले. मी रश्मी शुक्ला यांना धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपन्यांचा तपशील दिला. धनंजय मुंडे यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड, जगमित्र शुगर या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे भागीदार आहेत. अशा कंपन्यांना महाजेनको कंत्राट कसे देऊ शकते? महाजेनकोकडून धनंजय मुंडे यांच्या कंपनीला थेट फायदा झाला आहे. आमदार, खासदार अशाप्रकारे त्यांच्या कंपनीसाठी कोणताही फायदा मिळवत असतील तर ते लाभाचे पद (Office of Profit) या नियमाचे उल्लंघन ठरते. यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडा त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मी या सगळ्याचा तपशील रश्मी शुक्ला यांना दिला आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
वाल्मिक कराडला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात बुधवारी बीड जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. सीआयडीने कोर्टात याप्रकरणाचा प्राथमिक तपास संपल्याचे सांगितले. वाल्मिक कराडला इतक्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी मिळाली? काल वाल्मिक कराडचा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सखोल चौकशी झाली पाहिजे होती. मग वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी कशी मिळाली, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
विष्णू चाटेला हवे असलेल्या जेलमध्ये पाठवले: अंजली दमानिया
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला चॉईस ऑफ जेल देण्यात आले. चाटेला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी विष्णू चाटेचे नातेवाईक आणि जवळचे आठ-दहा लोक आहेत. मी त्यांची यादी पोलीस महासंचालकांना दिली आहे. माझी मागणी आहे की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास आणि खटला मुंबईत हलवण्यात यावा. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि इतर आरोपींना आर्थर रोड तुरुंगात ठेवावे. आरोपींचे पोलिसांसोबत असलेले संगनमत मोडून काढायला हवे. अन्यथा याप्रकरणात खरी चौकशी होणार नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्या जगमित्र शुगर्स या कंपनीसाठी 62 कोटी रुपयांचे कर्ज कशाच्या आधारावर देण्यात आले? उच्च न्यायालयाने याबाबत एसीबी, ईडी आणि सीआयडीला चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. मी हा सगळा तपशील रश्मी शुक्ला यांना दिला आहे. त्यांनी हे सगळे वाचून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
आणखी वाचा
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले