Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Sharad Pawar: जीबीएस रोगाचे पुण्यात आढळून आलेल्या 24 संशयित रुग्णांपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण 2 वर्षांचा आहे, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण 68 वर्षांचा असल्याची माहिती आहे
मुंबई : धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोनासारख्या गंभीर महामारीने दाखवून दिले आहे. मात्र, अनेकदा नवनवीन रोग व आजारांची साथ आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. सध्या पुणे शहरात जीबीएस नावाच्या आजाराने डोकं वर काढलं असून पुणे(Pune) महापालिकेनेही याची दखल घेत समिती स्थापन केली आहे. पुणे शहरात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या (Guillain-Barre Syndrome) न्यूरोलॉजिकल आजाराचे संशयित रूग्ण आढळून आले आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आता, या आजाराबाबत शरद पवार (Sharad pawar) यांनी ट्विट करुन संबंधित आजाराबाबत राज्य सरकार व महापालिकेन गंभीर दखल घेण्याची सूचना व्यक्त केली आहे.
जीबीएस रोगाचे पुण्यात आढळून आलेल्या 24 संशयित रुग्णांपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण 2 वर्षांचा आहे, तर सर्वाधिक वयाचा रुग्ण 68 वर्षांचा असल्याची माहिती आहे. पुणे महापालिका प्रशासनाने या आजाराची दखल घेत कमिटी स्थापन केली असून यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या आजाराचे संकट ओळखून योग्य ती खबरादारी घेण्याचंही पुणे महापालिका व राज्य सरकारला सूचवलं आहे.
'जीबीएस' अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल. दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन सूचना केल्या आहेत.
'जीबीएस' अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 22, 2025
काय आहे गुलेन बॅरी सिंड्रोम
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barre Syndrome) या आजाराने बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती मज्जातंतूवर आघात करते. हाता-पायांमधील ताकद कमी होणे आणि मुंग्या येणे, गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे या आजारामध्ये दिसून येत आहेत. संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त आणि लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.