Qatar : कतारने हवाई क्षेत्र बंद केलं, इराण-इस्त्रायल अमेरिका संघर्षाची युद्धाच्या दिशेने वाटचाल
Iran Israel US Tension : कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअर बेस असून त्यावर इराण हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

Iran Attack On US : इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कतारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कतारने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला असून सर्व उड्डाणांवर बंदी घातली आहे. नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. अमेरिकेने इस्त्रायल आणि इराण युद्धामध्ये उडी घेतली असून इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमावर हल्ला केला. त्यामुळे आता या युद्धाला व्यापक स्वरुप मिळण्याची शक्यता आहे.
US Attack On Iran : अमेरिकेच्या हल्ल्याला इराण प्रत्युत्तर देणार
अमेरिकेने ऑपरेशन मिडनाइट हॅमर अंतर्गत इराणातील न्यूक्लियर सुविधा असलेल्या जसे फोर्डो, नटनझ आणि इस्फाहान या ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यानंतर इराणकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच कतारने आपले हवाई क्षेत्र हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन आणि ब्रिटिश दुतावासांनी कतरमधील त्यांच्या नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
कतारमध्ये अमेरिकेचा अल उदीद हा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअर बेस आहे. त्यामुळे या ठिकाणी इराणकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार अमेरिकन सैन्य तैनात असल्याची माहिती आहे.
कतारने हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर त्या दिशेने येणारी विमाने ही इतर विमानतळांवर वळवण्यात आल्याचे फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सने म्हटलं आहे. फ्लाइटराडार24 नुसार, दोहा येथे 100 उड्डाणे जातात. हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्य पूर्वेतील एक प्रमुख ट्रान्झिट हब आहे. कतारमधील अनेक विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले आहे.
Flights bound for Doha Airport are diverting to nearby airports. According to media reports the Qatar airspace has been closed. pic.twitter.com/7iztqGKLI1
— Flightradar24 (@flightradar24) June 23, 2025
होर्मुझची सामुद्रधुनी बंद, इराणचा निर्णय
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत.
जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्त्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे एका आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत वाढून ब्रेंट क्रूड 80 डॉलर्सवर गेलंय. युद्ध लांबल्यास ब्रेंट क्रूडचे दर 120 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकतं अशी भीती आहे.























