(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Putin : पुतीन यांच्या सल्लागाराने रशिया सोडले, युक्रेन युद्धामुळे निर्णय घेतला
Russia Ukraine War : युद्धात युक्रेनचा कडवा प्रतिकार सहन करत असलेल्या रशियाला धोरणात्मक पातळीवर धक्का बसला आहे. राष्ट्रपती पुतीन यांच्या सल्लागाराने राजीनामा दिला असून त्यांनी देशही सोडला आहे.
Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सल्लागार एनतोली चुबाइस यांनी राजीनामा दिला आहे. त्याशिवाय त्यांनी देशही सोडला असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. युक्रेन युद्धावरून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
एनतोली चुबाइस हे 1990 च्या दशकातील आर्थिक सुधारकांपैकी एक आहेत. त्याशिवाय ते पुतीन यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पाश्चिमात्य देशातील अधिकाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. चोबाइस यांच्या राजीनाम्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
चोबाइस हे रशियातील खासगीकरणाच्या धोरणाचे शिल्पकार समजले जातात. चोबाइस यांच्या मार्गदर्शनात पुतीन यांनी काम केले आहे. 90 च्या दशकाच्या अखेरपर्यंत पुतीन यांनी त्यांचा प्रभाव वाढवला आणि रशियन सत्ताकारण प्रवेश केला. त्यावेळीही चोबाइस यांची भूमिका महत्त्वाची होती.
चोबाइस यांनी मंगळवारी लिहिलेले राजीनाम पत्र काहीजणांनी पाहिले असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी राजीनाम्याबाबत काही संकेत दिले असल्याचे म्हटले जाते. आर्थिक सुधारकांपैकी एक असलेले येगोर गैदर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी एक पोस्ट लिहिली होती. येगोर गैदर हे धोरणात्मक जोखीम, धोके माझ्यापेक्षा अधिक समजू शकत होते. याबाबतीत मी चुकीचा ठरलो असल्याची कबुली त्यांनी दिली.
युक्रेनचा मोठा दावा
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरूच आहे. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, या युद्धात आतापर्यंत 15,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून ही माहिती दिली. युद्धात आतापर्यंत 15,300 रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनियन सैन्याने रशियाची एकूण 99 विमाने, 123 हेलिकॉप्टर, 509 रशियन टँक, 24 UAVs, 15 विशेष उपकरणे, 1000 वाहने, 45 विमानविरोधी युद्ध प्रणाली, 1556 विविध चिलखती वाहने नष्ट केली आहेत असल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: