(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War : युद्धामुळे नागरिकांना महागाईचा फटका, रशियन सुपरमार्केटमध्ये साखरेसाठी धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल
Ukraine Russia War : युक्रेनवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर बंदी घातली आहे, त्यामुळे इतर अनेक उत्पादनेही महाग होत आहेत.
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 27 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रशियन सुपरमार्केटमध्ये नागरिक साखरेसाठी आपापसात धक्काबुक्की करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. अनेक यूजर्स देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी पुतिन यांना जबाबदार धरत आहेत.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने सर्व रशियन स्टोअरमध्ये केवळ 10 किलो साखर ठेवण्याची मर्यादा घातली आहे. ज्यामुळे सर्वच भागात लोकांना सहज साखर मिळू शकते. तर, दुसरीकडे रशियात साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील वार्षिक चलनवाढ 2015 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे साखरेच्या दरात सुमारे 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Сахарные бои в Мордоре продолжаются pic.twitter.com/hjdphblFNc
— 10 квітня (@buch10_04) March 19, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, लोकांचा जमाव शॉपिंग कार्टमधून साखरेच्या पिशव्या घेण्यासाठी आपापसात भांडताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. या व्हिडीओने ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, ते अधोरेखित करण्यासाठी लोक हे बिनदिक्कतपणे शेअर करत आहेत.
युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये महागाई वाढली
या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये महागाई वाढली आहे. दुसरीकडे, रशियाकडून युक्रेनवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यामुळे अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर बंदी घातली आहे, त्यामुळे इतर अनेक उत्पादनेही महाग होत आहेत. रशियावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यामुळे टीव्हीसारख्या परदेशी आयात वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रशियन सरकारने चलन नियंत्रण लागू करून महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. कारण रशियातील इतर वस्तूंच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : नाटोनं युक्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं आवाहन
- Plane Crash in China : चीनमधील विमान अपघातानंतर भारत सर्तक, डीजीसीएचा बोईंग विमानांवर पाळत ठेवण्याचा निर्णय
- Petrol Diesel Price : खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेल महागलं, 137 दिवसांनंतर इंधन दरवाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha