PM Modi : भारत-फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार, आयफेल टॉवरपासून होणार सुरुवात : नरेंद्र मोदी
PM Narendra Modi : भारत आणि फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार झाला आहे. त्यामुळं आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यासाठी ते काल रवाना झाले. दरम्यान, काल भारत आणि फ्रान्स यांच्या विविध करार झाले आहेत. यामध्ये महत्वाचा करार म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यात UPI संदर्भात करार झाला आहे. त्यामुळं आता भारतीयांना फ्रान्समध्ये UPI द्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवी बाजारपेठ खुली होईल. भारताला वेगाने विकसीत देश बनवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही UPI सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था आहे. 2022 मध्ये या संस्थेनं फ्रान्सच्या जलद आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सिस्टम Lyra सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर 2023 मध्ये UPI आणि सिंगापूरच्या PayNow यांनी करारावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे दोन्ही देशांच्या वापरकर्त्यांना देशाबाहेर व्यवहार करता येतील. UAE, भूतान आणि नेपाळने आधीच UPI पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. NPCI इंटरनॅशनल युएस, युरोपियन देश आणि पश्चिम आशियामध्ये UPI सेवा विस्तारित करण्यासाठी चर्चा करत आहे.
भारत आणि फ्रान्स यांच्यात मैत्रीचे अतूट नाते
जग एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. त्या दृष्टीनं भारताची क्षमता आणि भूमिका यामध्ये झपाट्याने बदल होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी G-20 च्या भारताच्या अध्यक्षपदाचा संदर्भ दिला. प्रथमच एखाद्या देशाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक कानाकोपऱ्यात 200 हून अधिक बैठका झाल्या आहेत. जी-20 गट भारताची क्षमता पाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. हे स्नेहसंबंध केवळ दोन देशांच्या नेत्यांमधील नसून भारत आणि फ्रान्स यांच्यातील अतूट मैत्रीचे ते प्रतिबिंब आहे.
भारताने 42 कोटी देशवासीयांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले
आज संपूर्ण जग भारताप्रती आशावादी आहे. UN च्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की, अवघ्या 10 ते 15 वर्षांत भारताने 42 कोटी देशवासीयांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे. हे संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा ते अधिक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 10 वर्षांत भारत जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन बनायला वेळ लागणार नाही. भारताचा UPI फ्रान्समध्ये वापरण्याबाबतही करार झाला आहे. येत्या काही दिवसांत त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा दीर्घकालीन पोस्ट स्टडी व्हिसा दिला जाईल, असा निर्णयही घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: