एक्स्प्लोर
पाच लाख मोजून केटरिंग, लग्नात जोडप्याच्या माथी थर्माकोलचा केक
फिलिपिन्स देशातील शाईन तामायो आणि जॉन शेन या जोडप्याने केटररसाठी तब्बल एक लाख 40 हजार पेसो म्हणजेच अंदाजे पाच लाख रुपये मोजले. मात्र जेव्हा ते रिसेप्शनला पोहचले, तेव्हा जेवणच नव्हतं.

मनिला, फिलिपिन्स : लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी घरातील प्रत्येकाचे प्रयत्न सुरु असतात. फिलिपिन्स देशातील एका जोडप्यालाही त्यांचं लग्न कायमस्वरुपी स्मरणात राहणार आहे. याचं कारण, या जोडप्याने तब्बल पाच लाख रुपये देऊन मागवलेला केक चक्क थर्माकोलचा निघाला. आजकाल वेडिंग प्लानरच्या गळ्यात लग्नाची सर्व जबाबदारी टाकून अनेक जण मोकळे होतात. एकदा का त्याच्यावर काम सोपवलं, की डोक्याला टेन्शन नाही. मात्र फिलिपाईन्समधील या जोडप्याची डोकेदुखी वेडिंग प्लानरने वाढवली. तब्बल एक लाख 40 हजार पेसो म्हणजेच अंदाजे पाच लाख रुपये शाईन तामायो आणि जॉन शेन या जोडप्याने केटररसाठी मोजले. मात्र जेव्हा ते रिसेप्शनला पोहचले, तेव्हा जेवणच नव्हतं. अखेर नूडल्ससारखा स्ट्रीटफूडचा पर्याय निवडण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे सगळं एवढ्यावर थांबलं नाही. शाईन आणि जॉन केक कापण्यासाठी स्टेजवर आले. यम्मी दिसणारा केक पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. मात्र वरकरणी चविष्ट दिसणारा केक चक्क थर्माकोलचा असल्याचं कापताना लक्षात आलं. शाईन आणि जॉन यांना फक्त वाईट सेवाच मिळाली नाही, तर शेकडो पाहुण्यांसमोर त्यांच्यावर नामुष्की ओढवली. सर्वांदेखत मान खाली घालण्याची वेळ वधू-वरांवर आली. पाठवणीवेळी जितकी धाय मोकलून रडणार नाही, तितकी नववधू शाईन या अवमानामुळे रडून लालेलाल झाली. अखेर दोन्ही कुटुंबांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी वेडिंग प्लानरच्या मुसक्या आवळल्या. मात्र चारचौघांत झालेल्या अपमानाची भरपाई कशी होणार?
आणखी वाचा























