एक्स्प्लोर
'पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र', संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर!

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भाषणाला चोख प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र असून सातत्याने दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेलं असतं, असा थेट आरोप केला. भारतात पाकिस्तानी सीमेपलीकडून केल्या जात असलेल्या दहशतवादी कारवाया या युद्धगुन्हे असल्याचा आरोपही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरचा प्रश्न सुटल्याशिवाय भारताबरोबरचे संबंध सुधारणार नाहीत, असं आपल्या भाषणात स्पष्ट केलं होतं. संयुक्त राष्ट्रांनी ज्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं आहे, अशांना पाकिस्तानात पूर्ण मोकळीक आणि स्वातंत्र्य मिळतं. ते पाकिस्तानच्या रस्त्यांवरून खुलेआम फिरत असतात, तसंच पाकिस्तानी सरकारच्या संमतीने आणि सहकार्यानेच भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी चिथावणी देत असतात, असंही भारताने प्रत्युत्तरात म्हटलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणानंतर भारताला त्याला उत्तर देण्याची एक संधी असते. संयुक्त राष्ट्रांच्या नियमानुसार, जर एखाद्या राष्ट्रप्रमुखाने दुसऱ्या राष्ट्र प्रमुखांवर किंवा देशावर आरोप केले तर त्याला उत्तर देण्याची संधी संबंधित देशाला देण्यात येते, त्याचाच फायदा उचलत भारतीय प्रतिनिधीने पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेतला. संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाच्या प्रधान सचिव इनाम गंभीर यांनी नवाज शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेताना, मानवाधिकारांचं भीषण उल्लंघन म्हणजे दहशतवादच असून जेव्हा अशा प्रकारचा दहशतवाद एखाद्या देशाच्या संमतीने आणि मदतीने चालतो तेव्हा तो युद्ध गुन्हा असतो. भारतात घातपाती आणि दहशतवादी कारवाया करणं हा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग असल्याचा आरोपही गंभीर यांनी केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या मदतीचा वापर पाकिस्तान सरकार भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी करतं. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर आणि आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी ऊर रहमान लखवी यांच्या सारख्या संयुक्त राष्ट्राने दहशतवादी ठरवलेल्या पाकिस्तानात पूर्ण मोकळीक मिळते, तसंच भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. भारतीय सैन्याकडून ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचा गौरव करण्याच्या प्रकाराचाही भारताने तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी दहशतवादी क्रूरकर्मा ठरलेल्या ओसामा बिन लादेनलाही पाकिस्ताननेच आश्रय दिल्याचा पुनरूच्चार इमान गंभीर यांनी आपल्या प्रत्युत्तरात केला.
आणखी वाचा























