Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये महापूर, आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू, आणीबाणीची घोषणा
Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये शतकातील महापूर आला आहे. यामध्ये बालकांसह 1000 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आता आणीबाणीची घोषणा केली आहे.
Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती पाहायाला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये शतकातील महापूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला असून आतापर्यंत लहान मुलांसह 1000 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) लागू करण्याची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये महापुरामध्ये आतापर्यंत 1000 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 343 मुलांचा समावेश आहे.
आतापर्यंतचा सर्वात भीषण पूर
पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (National Disaster Management) विभागाच्या माहितीनुसार, देशात 14 जूननंतर सिंध प्रांतामध्ये पुरामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलूचिस्तानमध्येही परिस्थिती फारच वाईट आहे. पाकिस्तीनी मीडिया रिपोर्टनुसार, देशातील 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक परिणाम सिंध प्रांतावर झाला आहे. या महाप्रलयामुळे सुमारे तील कोटी लोकांचे संसार वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत.
पाहा व्हिडीओ : पाकिस्तानमध्ये महापूर
पाकिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत 937 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- सिंध प्रांतात 306 लोकांचा मृत्यू झाला.
- बलुचिस्तानमध्ये पुरामुळे 234 जणांचा मृत्यू झाला आहे.
- खैबर पख्तूनख्वामध्ये 185 जणांचा मृत्यू
- पंजाब प्रांतात 165 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
- पीओकेमध्ये पुरामुळे 37 जणांचा मृत्यू झाला.
- गिलगिट बाल्टिस्तानमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा कहर
पाकिस्तानमध्ये भारताच्या सीमेपासून ते अफगाणिस्तान सीमेपर्यंतच्या भागात पुराचा कहर दिसत आहे. पाकिस्तान सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये असा भीषण पूर याधी कधीही आला नव्हता. मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांचे पाणी वस्त्यांमध्ये पोहोचलं आहे. पीओके, पंजाब, सिंध, बलुचिस्तान, अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा, स्वात खोऱ्याला पुराचा मोठा फटका बसला आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 241 टक्के जास्त पाऊस झाला आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्करासह सार्वजनिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे.